Connect with us

गोवा खबर

जागतिक पर्यावरण दिनी मिरामार बीचवर ‘द प्लॅस्टिक पल्लू’ कलाकृतीचे अनावरण

Published

on

Spread the love
प्लॅस्टिक प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रेरक म्हणून ही कलाकृती शक्तिशाली प्रतीक म्हणून ठरणार प्रभाव
गोवा खबर:पर्यावरण संरक्षण आणि शाश्वततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यंदा ५०व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि “वसुधैव कुटुंबकम” म्हणजेच “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य”, या २०२३मध्ये भारतीय अध्यक्षतेखालील बैठकांच्या पार्श्वभूमीवर मिरामार किनाऱ्यावर ‘द प्लॅस्टिक पल्लू’ या मत्स्यात्कृती कलाकृतीचे उद्घाटन करण्यात आले.
पूर्णतः टाकाऊ, प्लॅस्टिक कचऱ्यापासून बनवलेल्या या भव्य मत्स्याकृती कलाशिल्पाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आणि जी२० बैठकांसाठी गोव्याचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स यांच्या हस्ते करण्यात आले.
बाटल्या, पिशव्या आणि पॅकेजिंग साहित्य अशा प्रकारचे एकवेळा वापरयोग्य प्लॅस्टिक टाकाऊ वस्तूंचा वापर करत अतीशय खुबीने खवले, पर, शेपूट असे हुबेहुब आकार देत हे मत्स्यशिल्प बनवण्यात आल्याचे दिसून येते.
याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले: “हे शिल्प आपल्याला समुद्रातील माशांची स्थिती स्पष्टपणे दर्शवते. एकवेळा वापरयोग्य असलेल्या प्लॅस्टिक वापरानंतर समुद्रातच साचून जाते व तेथील जीवनचक्रावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे अशा प्लॅस्टिकवर बंदी आणणे आवश्यक आहे. गोव्यात जी२० बैठकीद्वारे आम्ही शहरे सजवून जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.”
जी२० बैठकांसाठी गोव्याचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स म्हणाले: “विविध अभ्यास आणि सांख्यिकीय विश्लेषणानुसार, आमच्या महासागरांमध्ये गत अनेक वर्षे प्लॅस्टिकचे प्रमाण वाढले असून या प्लॅस्टिकचे भयानक व विपरित परिणाम झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्लॅस्टिकद्वारे होणारे प्रदूषण थांबले नाही तर २०५० मध्ये आपल्या महासागरात माशांपेक्षा जास्त प्लॅस्टिक असेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. या सांख्यिकीतून दिसणाऱ्या धोक्याचे प्रतिबिंब म्हणजे मिरामार किनाऱ्यावर उभारलेली ही मत्स्याकृती आहे. या शिल्पाकृतीतून भविष्यातील धोक्याची स्थितीची जाणीव नागरिकांना घडवून देण्याचा आमचा प्यत्न आहे. प्रदूषण कमी करणे आणि समुद्र वाचवणे यासाठी प्रत्येकाने सकारात्मक व सहभागात्मक कृतिशील राहण्याबाबत जागृती घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या, बाटल्या आणि डबे, कंटेनरचा अवलंब करणे, पुनःप्रक्रिया प्रयत्नांना सहकार्य, समर्थन देणे आणि प्लॅस्टिक प्रदूषणाच्या परिणामांबद्दल जागरूकता पसरवणे यासारख्या शाश्वत पर्यावरण व जीवनचक्राचे संवर्धन करणाऱ्या पर्यायांचा स्वीकार करण्याची वेळ आली आहे, याची जाणीव ही कलाकृती आपणास करून देते.
सागरी जीवनावर आणि आपल्या ग्रहाच्या जैवविविधतेवर प्लॅस्टिक प्रदूषणामुळे होणारे घातक, हानिकारक परिणाम दर्शवण्याचे काम ही कलाकृती प्रभावीपणे करते.
या कृलाकृतीमध्ये वापरलेल्या प्लॅस्टिकच्या विविध रंगछटा आणि पोत ही प्रदूषकांची विविधता आणि त्यांचे आपल्या पर्यावरणावरील घातक परिणाम प्रभावीपणे दर्शवतात.
लोकांनी प्लॅस्टिक वापर कमी करावा, प्लॅस्टिक प्रदूषण टाळावे आणि याद्वारे आवश्यक बदलाचा एक भाग बनावे यासाठी प्रेरणा म्हणून, प्रतीक म्हणून ही ‘द प्लॅस्टिक पल्लू’ कलाकृती एक शक्तिशाली दृष्यरूपक म्हणून काम करणार आहे. या कलाकृतीच्या निर्मितीसाठी १२ दिवस लागले आहे. ही कलाकृती आगामी पाच महिने प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
आपले समुद्र प्लॅस्टिक कचरामुक्त होतील, सागरी जीवनचक्र सुरक्षित व शाश्वत बनेल आणि त्याद्वारे आपल्या पृथ्वीचेही आरोग्य टिकेल या भविष्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.
जागतिक पर्यावरण दिन या संकल्पनेस यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाच्या उपक्रमासाठी प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांचे प्रयत्न, कार्य, कृती यावर या उपक्रमातून प्रकाश टाकला जात आहे. पर्यावरण संरक्षण आणि हरित धरतीसाठी पर्यावरणप्रिय कार्यपद्धतींचा, वस्तूंचा वापर करण्यास प्राधान्य देण्यासाठी वैयक्तिक नागरिक, शासन, आंतरराष्ट्रीय संस्थांना याद्वारे प्रोत्साहित केले जाते.

Continue Reading