गुजरात आणि महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या रविवारी होणाऱ्या १०० व्या ‘ मन की बात ‘ या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे राज्यातील सर्व मतदारसंघात आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी दिली.
पक्षाच्या येथील मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सर चिटणीस दामू नाईक उपस्थित होते. रविवार दि. ३० मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या सह ‘ एक भारत श्रेष्ठ भारत ‘ या उपक्रमाचा भाग म्हणून पणजीतील सम्राट थिएटर येथे नव्याने उभारलेल्या सभागृहात महाराष्ट्र आणि गुजरात दिन साजरा करण्यात येणार असल्याचे शेट – तानावडे यांनी सांगितले.
राज्यात पक्षाचे एकूण १७२२ बूथ आहेत. पैकी १२५० बुथवर मन की बात चे प्रक्षेपण करण्यात येणार असून या कार्यक्रमास पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पक्षाचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमस्थळी उपस्थित असतील. खासदार विनय तेंडुलकर फोंडा येथे तर केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक पर्वरी येथील कार्यक्रमास उपस्थित असतील. पणजीतील मुख्यालयात ही हा कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेताच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी मन की बात या कार्यक्रमास सुरुवात केली. या कार्यक्रमात कोणतीही राजकीय भूमिका मांडली जात नाही. किंवा या व्यासपीठाचा राजकारणासाठी वापर केला जात नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या कार्याची माहिती खुद्द पंतप्रधान देशातील नागरिकांना देतात. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी गोव्यातील दिव्यांगासाठी केलेल्या पर्पल महोत्सवाचा उल्लेख केला होता. तसेच रांगोळी कलाकार दत्तगुरु वांतेकर यांचाही उल्लेख केला होता.
या रविवारी होणारा मन की बात हा कार्यक्रम १०० वा असल्याने संपूर्ण राज्यभर याचे आयोजन केले असल्याचे शेट – तानावडे यांनी सांगितले. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत आयोजित गुजरात आणि महाराष्ट्र दिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.