हिरवाईने नटलेले गोव्यातील रस्ते जी२० निमंत्रितांच्या स्वागताला सज्ज
गोवा वन खात्याच्या वतीने रंगबिरंगी, ऑर्नॉमेंटल वनस्पती, फॉक्सटेल, वेत्शिया मेरिली पाम्स सारख्या वनस्पतींच्या लागवडीद्वारे राज्यातील प्रमुख रस्तामार्गांचे सुशोभिकरण
गोवा खबर:गोवा वन खात्याच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गांचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विविधरंगी वनस्पतींच्या माध्यमातून या रस्त्यांवर सौंदर्यपताका चढवल्या जात आहेत. एकूणच जी२० बैठकांसाठी निमंत्रित पाहुण्यांचे जंगी स्वागत करण्याच्या उद्देशाने रस्त्यांचे दुभाजक, मोकळ्या जागा आकर्षक हिरवाईने नटू लागल्या आहेत.
१७ एप्रिल पासून गोव्यामध्ये जी२० बैठकांना सुरवात होत असून या पार्श्वभूमीवर हरित शहर आणि निसर्गरम्य परिसर घडवण्याच्या उद्देशाने वन खात्याने हा उपक्रम राबवला आहे. रस्ता दुभाजक, रस्त्याच्या बाजूच्या मोकळ्या जागा किंवा पट्टे येथे ऑर्नामेंटल तसेच रंगबिरंगी फुलांची झाडे लावली जात आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, मेरशी ते पणजी कदंब बस स्थानक, बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय ते दोनापावला येथील राष्ट्रीय सागरीशास्त्र संस्था (एनआयओ), वेर्णा ते दाबोळी विमानतळ आणि मेरशी सर्कल ते जुने गोवे या मार्गांचे हरितीकरण व सौंदर्यीकरण केले जात आहे.
गुरे खात नाहीत किंवा भटक्या कुत्र्यांद्वारेही नुकसान होणार आणि त्यामुळे रस्ता दुभाजकांमध्ये लावल्यानंतरही रोप जगण्याची अधिक शक्यता असेल अशा प्रकारच्या वनस्पतींची निवड वन खात्याद्वारे करण्यात आली आहे. तसेच विविध रंगसंगतीनुसारही या रोपांची निवड करण्यात आली असून मेरशी सर्कल येथे १०० फॉक्सटेल पाम रोपे लावण्यात आली आहेत. यामुळे एकूणच मेरशी सर्कलचे सौंदर्य आणखीन खुलले आहे. तसेच चिखली सर्कल ते दाबोळी विमानतळ या १.७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच वेर्णा सिग्नल येथील त्रिकोणी वाहतूक बेट, वेर्णा जंक्शन ते दाबोळी विमानतळ हा रस्ताही रंगबिरंगी झाडांनी सजवला गेला आहे.
रस्ता दुभाजकांसाठी नेरियम, टेकोमा (नारिंगी व रोझी), जत्रोफा, फायकस, वेत्चिया मेरिली पाम आणि बोगनविलिया यासारख्या वेली, वनस्पतींची निवड करण्यात आली आहे. वाहतूक बेटांवर बगीचा फुलवला जात आहे, विविध आकर्षक आकारांमध्ये झाडांची छाटणी, तसेच तसेच गोल्डन पॅन्डानस, कोडिया, रासोलिया, टेकोमा, लोरोपेटॅलम अशा प्रकारच्या वनस्पती लावल्या जात आहेत.
आकर्षकपणा आणि कमी देखभालीची गरज या वैशिष्ट्यांमुळे या वनस्पतींची निवड करण्यात आली आहे. या वनस्पतींमुळे परिसराची सौंदर्यता खुलते आणि प्रवाशांसाठीही आल्हाददायक, प्रसन्न वातावरणाची निर्मिती करू शकतात. त्याचबरोबर लॅगरस्ट्रोमिया स्पेसओसा .
(प्राइड ऑफ इंडिया), पेल्टोफोरम (यलो फ्लेमबॉयन्ट), कासिया फिसुला (गोल्डन शॉवर), नीलमोहर (जॅकारान्डा मिमोसफोलिया), स्पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), बहुनिया ब्लेकिना आदी वनस्पती प्रकारही मेरशी सर्कल ते जुने गोवे या आठ किलोमीटर लांब पट्ट्यावर लावण्यात आले आहेत.

दाबोळी विमानतळाबाहेर आकर्षक वनस्पतींना विविध आकार देण्याबरोबरच रंगबिरंगी वनस्पती, फुलझाडेही लावण्यात आल्याने हा परिसर अनोख्या हिरवाईने नटून गेला असून येथील वातावरण प्रसन्नमय झाले आहे. मात्र वेर्णा वाहतूक बेट, बोगमाळो जंक्शन तसेच दाबोळी विमानतळाजवळील काही जागा अशा ठिकाणीच मोकळ्या जागेवर बागविकासाची कामे करण्यात येणार आहेत.
अधिक तापमान, पावसाविना नव्या रोपांची लागवड करणे आणि ही रोपे जगवणे हे अवघड व आव्हानात्मक काम असते. मात्र, वन खात्याने सांर्वजनिक बांधकाम खात्याच्या मदतीने योग्य उपाययोजना करून या रोपांना दिवसांतून किमान दोनवेळा पाणी देण्याची व्यवस्था केली आहे.
याबाबत उप-वनसंरक्षक विशाल सुर्वे म्हणाले, “झाडांना पाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. मार्च-एप्रिल या उन्हाळी महिन्यांत रोपलागवड करणे हे मोठे आव्हानात्मक काम असते. या झाडांना रोज किमान दोनदा पाणी दिले जाईल यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याबरोबर समन्वय साधून काम करत आहोत.”
मेरशी सर्कल ते जुने गोवे, पणजी शहर परिसर या ठिकाणी जवळपास १०,००० फुलझाडे व शोभिवंत झाडे तर रस्ता दुभाजक आणि रस्त्याच्या दुतर्फा २०,००० रोपे लावण्याचे नियोजन वन खात्याने केले आहे. पुणे-महाराष्ट्र तसेच राजमुंद्री-आंध्र प्रदेश येथील खासगी रोपवाटिकांकडून फॉक्सटेल पामसह विविध फुलझाडे व शोभिवंत झाडे मागवण्यात आलेली आहेत.
“लँडस्केपिंग तर हिरवाईमुळे कोणत्याही जागेचे महत्व, मूल्य वाढत अशते. गोव्याच्या वातावरणामध्ये वाढतील, तग धरतील अशा प्रकारच्याच वनस्पती, रोपे निवडण्यामध्ये आम्ही बारकाईने अभ्यास करून निवड केली आहे. तसेच जी-२० बैठकांच्या आयोजनाचा विचार करून आम्ही रस्ता दुभाजक तसेच वाहतूक बेटांच्या रचनेमध्येही लक्षणीय बदल केले आहेत,”अशी माहिती जी-२० साठीचे राज्याचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांनी दिली.
रस्ता दुभाजक तसेच दुतर्फा झाडे लावण्याच्या या उपक्रमामुळे गोव्यातील रस्ते म्हणजे हरितपट्टे होणार असून आकर्षक रंगबिरंगी दुभाजकांमुळेही परिसराला नवे सौंदर्य मिळणार आहे. शाश्वत, पर्यावरणपूरक विकासाचा एक भाग म्हणून तसेच जी२०च्या उद्दिष्टांशी सुंसगत असा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
ग्रुप ऑफ ट्वेंटी किंवा जी२० हा जगातील सर्वात शक्तिशाली १९ अर्थव्यवस्था आणि युरोपी महासंघ यांचा समावेश असलेला आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीचा प्रमुख मंच आहे. जी२० गटाची स्थापना आंतरराष्ट्रीय वित्त, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, हवामानातील बदलांमुळे होणारे स्थलांतर आणि शाश्वत विकासाशी संबंधित असलेल्या प्रमुख जागतिक समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपीय महासंघ (ईयु) या देशांचा समावेश जी२०मध्ये आहे. अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनाही या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.