Connect with us

गोवा खबर

 नवी दिल्लीतील आयआयटीएफ मध्ये गोवा होणार सहभागी

Published

on

Spread the love

गोवा खबर:नवी दिल्लीतील प्रतिष्ठित प्रगती मैदानावर १४ ते २७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या प्रतिष्ठित ४१व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी, देशातील उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर गोवा देखील या मेळ्यात सहभागी होणार आहे.

या वर्षीच्या आयआयटीएफ चा विषय, आत्मनिर्भर भारत चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांच्या लक्ष्यावर आधारित “व्होकल फॉर लोकल, लोकल  ते ग्लोबल” असा आहे.

आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाची पावती म्हणून, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची या विषयाभोवती आधारित दालने मांडण्यात येतील. यंदा आयआयटीएफ जागतिक आणि देशांतर्गत प्रदर्शनाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या, जागतिक दर्जाच्या लँडमार्क कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केले जाईल. हे अत्याधुनिक प्रदर्शन सभागृह ५१,००० चौरस मीटर एकूण क्षेत्रफळाचे आहे. या वर्षी, गोवा दालनाची स्थापना प्रगती मैदानावर ६० चौरस मीटर क्षेत्रफळावर केली जाईल.

गोव्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन, स्थानिक पर्यटन क्रियाकलाप वाढवण्याबरोबरच विविध क्षेत्रात सरकारने केलेल्या प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी, गोवा राज्य राष्ट्रीय राजधानीत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या आयआयटीएफ मध्ये भाग घेते.

औद्योगिक विकासाला चालना देणे आणि गुंतवणूक आकर्षित करणे, या व्यतिरिक्त, गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पाककृती आणि आदरातिथ्य चौदा दिवसांच्या आयआयटीएफ कालावधीत बाह्य जगासमोर सादर केला जाईल. या मेगा फेअरमध्ये अनेक परदेशी देशांचा सहभाग दिसेल.

आयआयटीएफ मध्ये गोवा राज्याच्या सहभागासाठी माहिती आणि प्रसिद्धी खाते नोडल विभाग आहे. डीआयपी व्यतिरिक्त इतर विभाग आणि महामंडळ जसे की, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय, पर्यटन विभाग, गोवा औद्योगिक विकास महामंडळ, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघु उद्योग, गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर विभाग देखील त्यांच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी सहभागी होणार आहे. हस्तकला कारागीर या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात त्यांची उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्री करतील.

यावर्षी गोवा दालनाची संकल्पना, रचना, व्यवस्थापन आणि संबंधित उपक्रमांचे काम अॅडव्हर्टायझिंग असोसिएट्स या गोव्यातील नामांकित संस्थेकडे सोपवण्यात आले आहे.

आयटीपीओ च्या माहितीनुसार, आयआयटीएफ च्या मागील आवृत्तीत भारत आणि परदेशातील ३ हजार हून अधिक प्रदर्शकांचा सहभाग होता. तसेच नवीन प्रगती मैदानावर प्रदर्शक आणि अभ्यागतांना सुलभ प्रवेश देण्यासाठी आणि प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून, प्रगती मैदान आणि आजूबाजूची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.२ किमीचा मुख्य बोगदा आणि ५ अंडरपाससह एक सर्वसमावेशक ट्रान्झिट कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. यामुळे मथुरा रोड आणि भैरोन मार्ग सिग्नल फ्री झालेला आहे.

Continue Reading