गोवा खबर: गोवा फुटबॉल विकास परिषदेचे (जीएफडीसी) अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर व उपाध्यक्ष श्रीकांत आजगावकर यांनी गोवा फुटबॉल संघटनेचे (जीएफए) अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
‘मी कायतान यांचे मोठ्या फरकाने जीएफए अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. जीएफडीसीचे सदस्य जीएफएच्या अध्यक्षपदी निवडून आल्यामुळे आमच्यासाठी देखील हा अभिमानाचा दिवस आहे. ते खूप मेहनती आहेत. फुटबॉलप्रती त्यांची समर्पक वृत्ती आहे. फुटबॉलला नवीन उंचीवर नेण्याचे त्यांचे स्वप्न आहे. जीएफडीसी सदस्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास असून जीएफएला ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवतील व उदयोन्मुख खेळाडूंना न्याय देतील, असे शंखवाळकर म्हणाले.
‘मी त्यांना पूर्ण साहाय करण्याचे आश्वास दिले आहे. गोव्याच्या फुटबॉलला पुन्हा सुवर्ण दिवस दाखवणे हे आमचे एकमेव ध्येय आहे. संपूर्ण समितीचे मी अभिनंदन करतो. एकत्र काम करून राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी झटूया, असे शंखवाळकर बैठकीनंतर म्हणाले. जीएफडीसीने आपले सदस्य संजीव नागवेकर यांचेदेखील जीएफए कार्यकारी समितीत निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. शंखवाळकर व आजगावकर यांनी नवीन जीएफए अध्यक्षांशी गोवन फुटबॉलला पुढे नेण्यासाठी आवश्यक उपायांवर प्राथमिक चर्चा केली.
फर्नांडिस यांची गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी ३० ऑक्टोबर रोजी निवड झाली होती. फर्नांडिस यांनी आपल्या कार्यकाळात फुटबॉलमध्ये मोठ्या गुंतवणूकीचे वचन दिले असून यात धुळेर मैदानावर पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या मैदानावर १.८ कोटी रुपये खर्चुन कृत्रिम टर्फ बसविण्यासह युवा विकास व ग्रासरुट फुटबॉलच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.