गोवा खबर:”सुबत्तेबरोबर समाजात विकृतीही येत असते, अशावेळी संस्कृतीचे रक्षण करण्याची क्षमता आपल्याजवळ असल्याचे सुभाष वेलिंगकर यांनी सिद्ध केले आहे, आपले अद्वितीय नेतृत्व त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे, त्यामुळे त्यांचा अम्रतमहोत्सव हा वैचारिक महोत्सव ठरेल “, असा विश्वास ‘सुभाष वेलिंगकर अम्रतमहोत्सव स्वागत समिती’चे अध्यक्ष प्रा. माधव कामत यांनी व्यक्त केला. मिनेझिस ब्रागांझा इंस्टिट्यूटमध्ये स्वागत समिती सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
“समाजाने आपल्याला दिलेल्या पेक्षा अधिक समाजाला देताना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार ९ रोजी वेर्णा येथे आयोजित करण्यात येत आहे,”असे ते म्हणाले.
समितीचे उपाध्यक्ष रामदास सराफ, अनिल खंवटे, किरण नायक, नितीन फळदेसाई तसेच प्रा. दीपक आमोणकर, प्रवीण नाईक व समन्वयक सुर्यकांत गावस व्यासपीठावर उपस्थित होते.
वेलिंगकर यांचा सत्कार हा त्यांच्या राष्ट्रीय तत्वांचा सत्कार असल्याचे प्रवीण नाईक म्हणाले. नितीन फळदेसाई यांनी सत्कारानिमित्त प्रकाशित करण्यात येणाऱ्या गौरवग्रंथात सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे सांगितले. प्रा.आमोणकर यांनी महालसा नारायणी मंदिर प्रांगणात आयोजित सोहळ्याची रूपरेखा स्पष्ट केली.
या सोहळ्यास, स्वामी ब्रह्मेशानंद, दुर्गानंद गिरी यांचे आशीर्वाद लाभणार असून संघाचे गोव्यातील माजी ज्येष्ठ प्रचारक प्रमोद कुलकर्णी यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती असणार आहे. सराफ यांनी वेलिंगकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव प्रेरणादायी ठरेल, असे सांगितले.
प्रारंभी संदीप पाळणी यांनी बैठकीचे प्रयोजन स्पष्ट केले. अभय खंवटे यांनी आभार मानले. अन्य सदस्यांसोबत ज्येष्ठ कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी बैठकीस उपस्थित राहून आपण स्वागत समितीचा सदस्य असल्याचे निश्चित केले.