गोवा खबर: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम जवळील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कृत्रिम टर्फ मैदानावर युवा सहभागींनी फुटबॉलचा मोठ्या संख्येने आनंद लुटला.
गोव्यात होणार्या आगामी महिलांच्या फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फिफाच्या स्थानिक आयोजन समितीने या अनोख्या दोन दिवसीय फुटबॉल कार्निव्हलचे आयोजन केले होते. फिफाच्या या बहुप्रतिक्षित स्पर्धेची स्थानिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देषशाने हा कार्निव्हल घेण्यात आला. ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत चालणार्या या स्पर्धेत गोव्याचा यजमानांमध्ये समावेश आहे.

गोवा फुटबॉल विकास परिषदेने (जीएफडीसी) ८ ते १७ वर्षे वयोगटातील ५९० प्रशिक्षणार्थींना गुरुवारी सुरू झालेल्या या ‘किक ऑफ ड्रीम’ फुटबॉल कार्निव्हलमध्ये पाठवले होते. जीएफडीसीच्या फातोर्डा, सेरावली, दवर्ली, शिरोडा, मायणा, कुडतरी, बाणावली, आंबेली, केपे, कुंकळ्ळी, देवबाग व सावयवेरे केंद्रातील हे प्रशिक्षणार्थी होते.
युवा उदयोन्मुख खेळाडूंसाठी ही आयुष्यातील अद्वितीय संधी होती. या दोन दिवसीय कार्निव्हलमध्ये फुटबॉलशी संबंधित अनेक मनोरंजनयुक्त खेळ घेण्यात आले. यात फ्री किक, फोर कॉर्नर, बोलिंग पिन, व्हॉली, हेडर आदींचा समावेश होता. सर्वांसाठी फुटबॉल या घोषवाक्याखाली हे खेळ घेण्यात आले.
मुलांच्या टॅलेंटला वाव मिळावा, लिंगभेद नसावा, सांघिक तसेच नेतृत्वकौशल्य वाढविणे हा या कार्निव्हल आयोजनामागील उद्देश होता.
कार्निव्हलमध्ये दोन ३ बाय ३ व एका ५ बाय ५ फुटबॉल मैदानाचा समावेश होता. यामध्ये मुलगे व मुली एकत्र येऊन फुटबॉल सामने खेळली. विशेष फुटबॉल फ्रीस्टाईल शिबिर यावेळी घेण्यात आले. यामध्ये पुरस्कारप्राप्त तज्ज्ञ फ्रीस्टाईलरने फुटबॉलसह विविध ट्रिक्स दाखवल्या. या ट्रिक्स शिकण्यासाठी उत्सुक खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शनदेखील केले.
फिफा अंडर १७ महिला विश्वचषक स्पर्धेची अधिकृत ट्रॉफी कार्निव्हलच्या दुसर्या दिवशी ठेवण्यात आली होती. स्पर्धेचे अधिकृत मास्कॉट ‘इभा’ हे विशेष आकर्षण देखील यावेळी होते.