गोवा खबर:गोवा सरकार गोव्यामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध व्हावे, कुठल्याही प्रकारचे शिक्षण येथे नाही असे होऊ नये आणि गोवा एक एज्युकेशन हब व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्याचसाठी गोवा सरकारने आतापर्यंत बीएससी इन फॉरेन्सिक सायन्स, नॅशनल स्कूल ऑफ लॉ, नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट संस्था, नॅशनल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, आयुष इन्स्टिट्यूट अशा अनेक संस्थाना मान्यता दिली व त्यांची सुरूवात केली आहे. नुकतेच गोव्यामध्ये साळगावकर शिक्षण संस्थेच्या सुनापरांत डिझाईन युनिव्हर्सिटीला गोवा सरकारने मान्यता दिली आहे .अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.
भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक विभागातर्फे पणजीत आयोजित शिक्षण दिन सोहळ्यात २७ शिक्षकांचा सत्कार केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते .यावेळी प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, शिक्षक विभागाचे संयोजक बाबाजी सावंत , भाजपाचे प्रदेश सचिव गोरख मांद्रेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की भाजपाच्या शिक्षण विभागाने शिक्षणासोबतच करिअर गायडन्स व इतर अनेक उपक्रम राबवून चांगले काम केलेले आहे. त्याबद्दल बाबाजी सावंत व त्यांच्या टीमचे आपण अभिनंदन करत आहे .गोव्यामध्ये डिझाईन युनिव्हसिटी व्हावी अशी अनेकांची मागणी होती . त्यामुळे साळगावकर शिक्षण संस्थेच्या सुनापरांत डिझाईनिंग युनिव्हर्सिटी ला सरकारने मान्यता दिली आहे. अन्य तीन यूनिव्हर्सिटीनाही मान्यता देण्यात येत असल्याचे सांगून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
एनआयटी सारखी संस्था शिक्षकांना प्रशिक्षण देते आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होतो . दुसरीकडे आयआयटी सारख्या चांगल्या संस्थेला लोक नाहक विरोध करतात. त्यांच्यात जागृती करण्याची नितांत गरज आहे. कारण सरकार प्रदूषण असलेले उद्योगात नाही तर नवीन शिक्षण संस्था आणत आहे. त्यामुळे लोकांनी त्या शिक्षण संस्थांना पाठिंबा देणे भावी पिढीच्या भवितव्यासाठी गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी आताच्या ई युगामध्ये ई शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी आपले ज्ञान वाढवून मूल्यवर्धित शिक्षणावर जास्त भर देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोडींग व रोबोटिक शिक्षण देणारे गोवा हे पहिले राज्य असल्याचे सांगून राज्यातील विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा आणि त्याच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध भागातील शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले काम केलेल्या २७ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला बाबाजी सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .