Connect with us

गोवा खबर

स्वयंपूर्ण बाजाराचा लाभ घ्या: तानावडे

Published

on

Spread the love
गोवा खबर:गणेश चतुर्थी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. चतुर्थी गोमंतकीयांचा अत्यंत महत्त्वाचा सण. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १२ ही तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेत स्वयंपूर्ण बाजाराची संकल्पना पुढे आणली आहे. या बाजारात गणेश चतुर्थसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात माटोळीसाठी लागणारे साहित्य, सजावटीचे सामान, मिठाई, फुले आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सर्व गोमंतकीय नागरिकांनी या बाजारपेठेचा लाभ घ्यावा. आणि चतुर्थीचे साहित्य खरेदी करावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी केले आहे. 
संपूर्ण गोमंतकात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेक घरांमध्ये माटोळी सजावट केली जाते. यासाठी विविध फळे, फुले, वनस्पती, वेली आदींचा वापर केला जातो. तसेच सजावटीसाठी इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात वापरले जाते. बऱ्याचदा काही गोष्टींसाठी लोकांना धावाधाव करावी लागते. खासकरून माटोळीचे साहित्य मिळवण्यासाठी वेगवेगळ्या बाजारांत जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने चतुर्थीचे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
आज शनिवारपासून स्वयंपूर्ण बाजार सुरू करण्यात आली आहेत.
सासष्टी तालुक्यात मडगाव आणि कुंकळी कदंब बस स्थानक येथे हा बाजार सुरू करण्यात आला आहे. काणकोण तालुक्यात काणकोण बस स्थानक, पैंगीण आणि काणकोण येथील श्रद्धानंद स्कूल इमारत, केपे तालुक्यासाठी कुडचडे जीसुडा येथील मैदान आणि स्थानिक बाजारात स्वयंपूर्ण बाजार आयोजित करण्यात आला आहे.
फोंडा तालुक्यासाठी पालिका बाजारपेठ मागील एअरपोर्ट रोड, कपिलेश्वर मंदिराजवळील रथमळ मैदान, वाळपे – शिरोडा कदंब बस स्थानक, मुरगाव तालुक्यात वास्को आणि सांकवाळ कदंब बस स्थानक, डिचोली तालुक्यात शिरोडकर सभागृहामध्ये, रमाकांत प्रदर्शन जागेत आणि पालिका सभागृहाजवळ, पेडणे तालुक्यात पेडणे कदंब बस स्थानक, बार्देश तालुक्यात म्हापसा नवीन कदंब बस स्थानक, आसगाव गणेश मंदिराजवळ, अस्नोडा कदंब बस स्थानक या ठिकाणी हा बाजार भरवण्यात आला आहे.
तिसवाडी तालुक्यासाठी मळवाल – आगशी, कासा दी पोवो ताळगाव, जुने पंचायत सभागृह येथे ताळगाव चर्च, सत्तरी तालुक्यात होंडा कदंब बस स्थानक, वाळपई कदंब बस स्थानक, धारबांदोडा क्रीडा मैदान आणि सांगे तालुक्यासाठी सांगे पालिका कॉम्प्लेक्स येथे हा बाजार सुरू करण्यात आला आहे.
गोमंतकीय नागरिकांनी या बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी केले आहे.