Connect with us

क्रीडा खबर

१३१व्या ड्युरँड ट्रॉफी गोवा टूरला गतविजेता एफसी गोवाच्या होमग्राऊंडवरून सुरुवात

Published

on

Spread the love

~ सलामीला (१६ ऑगस्ट) यजमानांचा सामना मोहमेडन स्पोर्टिंग क्लबशी ~

 

 

 गोवा खबर: ऐतिहासिक फुटबॉल स्पर्धा असलेल्या ड्युरँड ट्रॉफी स्पर्धेच्या गोवा येथील टूरला गतविजेता एफसी गोवा क्लबच्या होमग्राऊंडवरून दिमाखात सुरुवात झाली. गोवा राज्याचे पर्यटन तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते टूरचे अनावरण झाले. यावेळी ड्युरँड आयोजन समितीचे अध्यक्ष तसेच इस्टर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ, एसएम, व्हीएसएम लेफ्टनंट जनरल के. के. रेपसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. ड्युरँड ट्रॉफी टूरचे गोवा हे शेवटचे ठिकाण आहे. पाच शहरांतून गोवा येथे पोहोचलेल्या टूरला १९ जुलैला कोलकाता येथून हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यानंतर ही टूर गुवाहाटी, इम्फाळ आणि जयपूर मार्गे गोवा येथे दाखल झाली. गोवा येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ड्युरँड चषक ट्रॉफी टूर ही स्पर्धेच्या मुख्य ठिकाणी कोलकाता येथे परतेल.

 

गोवा राज्याचे फुटबॉलशी अतूट नाते आहे. त्यातच ऐतिहासिक ड्युरँड ट्रॉफी टूरचे तीन वेळा यजमानपद गोवन फुटबॉल क्लबने भूषविले आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. गोवावासियांच्या नसानसांमध्ये फुटबॉल असल्यामुळे ड्युरँड ट्रॉफी टूरच्या निमित्ताने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. टूरच्या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी ड्युरँड ट्रॉफी समितीचा आभारी आहे. स्पर्धेतच्या यशस्वी आयोजनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असे गोव्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी यावेळी म्हटले.

 

ड्युरँड आयोजन समितीचे अध्यक्ष तसेच इस्टर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ, एसएम, व्हीएसएम लेफ्टनंट जनरल के. के. रेपसवाल  यांनीही यावेळी आपले विचार मांडले. गोव्याशिवाय देशातील फुटबॉलचा विचार करता येणार नाही. चॅम्पियन गोवाच्या होमवर ड्युरँड ट्रॉफीचे आगमन होण्याचा मोठा आनंद आहे. एफसी गोवा क्लबचे राष्ट्रीय फुटबॉलमधील विकासात मोठे योगदान आहे. त्यांना जेतेपद कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा, असे रेपसवाल म्हणाले.

 

एफसी गोवाचे अध्यक्ष आणि सह-मालक अक्षय टंडन यांनी आपले मत मांडताना सांगितले की, ड्युरँड ट्रॉफी टूरच्या गोव्यातील टप्प्यामुळे खूप आनंदी आहे. गोव्यातील फुटबॉलचे वेड सर्वश्रुत आहे. त्यामुळे टूरचे यजमानपद भूषवता आल्याचा अभिमान वाटतो. ड्युरँड ट्रॉफी पुन्हा होत असल्याने फुटबॉलर आणि चाहते आनंदित झाले आहेत. अशा स्पर्धांमुळे देशातील फुटबॉल खेळ वाढीला चालना मिळत आहे. एफसी गोवाने गेल्या वर्षी ट्रॉफी उंचावली. ही आमच्या क्लबसाठी मोठी अचिव्हमेंट आहे. यंदा ट्रॉफी आमच्याकडे कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू.

 

ड्युरँड ट्रॉफीच्या अनावरणानंतर भारतीय सैन्य दलाच्या बांबोलिन कॅम्पमध्ये ट्रॉफी ठेवण्यात आली. त्याचे औचित्य साधून एफसी गोवा मैदानात एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला.

सलामीच्या लढतीत यजमानांची गाठ मोहमेडन स्पोर्टिंग क्लबशी

 

यंदाच्या ड्युरँड ट्रॉफी स्पर्धेत सलामीला गतविजेता एफसी गोवा संघाची गाठ गेल्या वेळचा उपविजेता मोहमेडन स्पोर्टिंग क्लबशी पडेल. हा सामना १६ ऑगस्टला होईल. ही स्पर्धा १८ सप्टेंबर २०२२ पर्यंत चालेल. ड्युरँड ट्रॉफीमध्ये एफसी गोवा संघ तिसऱ्यांदा सहभागी होत आहे. मागील हंगामात कमालीचे सातत्य राखताना गोवा क्लबने जेतेपद पटकावले.

 

२०२१ ड्युरँड ट्रॉफी चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोलकाता स्थित मोहमेडन स्पोर्टिंग क्लबविरुद्ध ३ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर इडू बेडीया याने अतिरिक्त वेळेत म्हणजे १०३व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल एफसी गोवा संघाला जेतेपद मिळवून देणारा ठरला. गौर्सनी प्रथमच या ट्रॉफीवर नाव कोरले.

 

१३१व्या ड्युरँड ट्रॉफी स्पर्धेत २० संघ खेळणार आहेत. मागील स्पर्धेच्या तुलनेत चार संघांची भर पडली आहे. आयएसएल अर्थात इंडियन सुपर लीगमधील सर्वच्या सर्व ११ फ्रँचायझी संघ यंदा सहभागी होणार आहेत. आय -लीग स्पर्धेतील पाच आणि सर्व्हिसेसच्या चार संघांचाही समावेश आहे.

 

गतविजेता एफसी गोवा क्लबचा अ गटात समावेश आहे. त्यांच्या गटात मोहमेडन एससी, बेंगळुरू एफसी, आयएसएल विजेता जमशेदपूर एफसी आणि इंडियन एअर फोर्स असे तगडे संघ आहेत.

 

यंदाच्या ड्युरँड ट्रॉफी स्पर्धेत एकूण ४७ सामने खेळवले जाणार आहेत. अ आणि ब गटातील सामने पश्चिम बंगाल येथे होतील. इम्फाळ आणि गुवाहाटी येथे क आणि ड गटातील सामने खेळवले जातील. बाद फेरीतील (नॉकआऊट फेरी) सर्व सात सामने पश्चिम बंगालमधील तीन ठिकाणांवर होतील. अंतिम सामना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर (व्हीवायबीके) मैदानावर १८ सप्टेंबर २०२२ रोजी रंगेल.