गोवा खबर: रोटरी क्लब ऑफ पर्वरीतर्फे आयोजित ८ व्या गोवा टुरिजम -बीएनआय रोटरी रेन रन २०२२ साठी भारतीय सैन्याचे २ सिग्नल ट्रेनिंग सेंटर (एसटीसी) आणि भारतीय नौदलाचे गोवा नौदल क्षेत्र सहकार्य करणार आहेत. हे रन रविवारी ३१ जुलै रोजी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या ऍथलेटिक स्टेडियम, बांबोळी पासून( गोमेकॉसमोर) सुरू होईल. “आझादी का अमृत महोत्सव” निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गोवा पर्यटन खाते आणि बीएनआय, गोवा विभाग हे प्रमुख प्रायोजक असणार आहेत.
पणजी येथे गुरुवारी रेस-डे टी-शर्टचे अनावरण करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत याची घोषणा करताना, रोटरी रेन रनचे अध्यक्ष अविनाश परमार म्हणाले, “या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लष्कर आणि नौदलाची मदत मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाचा बाब आहे. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहोत. भूदल आणि नौदल उत्कृष्ट लॉजिस्टिक सोल्यूशन्स प्रदान करतात . ज्यामुळे कार्यक्रम अधिक चांगले बनविण्यास मदत होते,”
पत्रकार परिषदेला रोटरी क्लब ऑफ पर्वरीच्या अध्यक्षा डॉ.संध्या कदम, रोटरी रेन रनचे सह-अध्यक्ष गिरीश सावंत, २ एसटीसीचे कर्नल पंकज नारायण, बीएनआय गोवा विभागाचे कार्यकारी संचालक राजकुमार कामत , प्रकाश कॅन्सर एड प्रोजेक्ट (पीसीएपी) चे अध्यक्ष शेफन शेख आणि लष्कर व पर्यटन क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

परमार यांच्या म्हणण्यानुसार, रोटरी रेन रन (आर आर आर) हा एक महत्त्वाचा निधी उभारणीचा उपक्रम आहे. यामध्ये महिलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करणाऱ्या ‘प्रकाश कॅन्सर एड प्रोजेक्ट’च्या अंतर्गत कार्यक्रमातून वाचवलेले पैसे समाजाला परत देण्यात येणार आहेत. परमार यांनी गोवा पर्यटन आणि बीएनआयच्या सक्रिय पाठिंब्याबद्दल आभार मानले.
यंदाच्या कार्यक्रमात मुंबईचे ब्लेड रनर प्रदीप कुंभार आणि पणजी येथील कॅन्सर सर्व्हायवर मारिओला मॅथियास ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पर्वरी (आरसीपी), २ एसटीसी आणि गोवा नौदल क्षेत्र यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेत २,५, १० आणि २१ किमी अंतराच्या शर्यती होतील. १० आणि २१ किमी शर्यत अर्ध मॅरेथॉन वेळेनुसार होणार आहे. ५,१० आणि २१ किमी शर्यतीतील सहभागींना पदक, एक टी-शर्ट आणि नाश्ता मिळेल. तर २ किमी धावणाऱ्या धावपटू आणि चालणाऱ्यांना पदक आणि नाश्ता मिळेल.
२१ किमी धावपटू बांबोळी येथे गोमेकॉ समोरील, एसएजी ऍथलेटिक स्टेडियमपासून त्यांची धाव सुरू करतील आणि मिरामार किनारा सर्कलपर्यंत जातील व गोवा विद्यापीठाच्या रस्त्याने परततील. इतर श्रेणीतील धावपटू एसएजी ऍथलेटिक स्टेडियमपासून सुरू करून गोवा विद्यापीठ रस्त्यावरील विशिष्ट पॉइंटपर्यंत धावतील आणि प्रारंभ बिंदूवर परततील.
ऑनलाइन नोंदणी लिंक http://rainrun.rcporvorim.org आहे
गट नोंदणीवर सवलत आहे.