गोवा खबर: थिवी येथीलअठरा वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी नेपाळी युवकाला नाशिक(महाराष्ट्र) येथून अटक केली.
ती मुलगी 11 जूनपासून घरातून बेपत्ता होती. राजू अनिल सुनार (रा. आकय-म्हापसा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पिडितेच्या मोठ्या बहिणीने याप्रकरणी पोलिस दिलेल्या तक्रारीत तिच्या बहिणीचे एका अनोळखी व्यक्तीने अपहरण केले असून तिला अज्ञात जागी ठेवल्याचे म्हटले होते. पोलिसांना तपासावेळी या पिडित बेपत्ता अपहरण मुलीचे मोबाईल लोकेशन हे नाशिक( महाराष्ट्र) येथे असल्याचे आढळून आले होते.हे ठिकाण नाशिक मधील अंबाड पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येत होते.
त्यानुसार 18 जून रोजी, विशेष पथकाची स्थापना करण्यात आली, त्याचे नेतृत्व हेड कॉन्स्टेबल अजय गावकर यांनी केले. गोवा पोलिसांनी अंबड पोलिसांच्या सहाय्याने शोध मोहिम सुरु केली. यावेळी चुंचाळे, नाशिक येथे संशयित राजू सुनार यास ताब्यात घेतले. तसेच बेपत्ता अपहरण झालेल्या मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली. या दोघांना गोव्यात आणण्यात आले. याप्रकरणी संशयिताला भादंसंच्या कलम 365 अन्वये अटक झाली आहे.
ही मोहिम पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप अधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक, महिला पोलिस उप निरीक्षक सोनम वेर्णेकर,हेड कॉन्स्टेबल अजय गावकर,रामा नाईक, सुधीर परब,सुलेश नाईक आणि रावजी नाईक यांच्या पथकाने यशस्वी केली.