गोवा खबर:मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शहरात तेवा इंडियाच्या पाठिंब्याने रिस्पॉन्सिबल नेटिझमने सुरू केलेल्या मुलांसाठी, तरुणांसाठी आणि प्रौढांसाठी भारतातील पहिल्या समग्र सायबर वेलनेस सेंटरचे उद्घाटन केले.
गोव्यात भारतातील पहिल्या सायबर वेलनेस सेंटरचे स्वागत करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थी, युवक, प्रौढ यांच्यात होत असलेल्या सायबर गुन्ह्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि गोव्यातील जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले. सायबर सेलमध्ये अनेक तक्रारी येतात परंतु जागरूकतेचा अभाव असल्याने अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत अशी टिप्पणी त्यांनी केली.
सायबर वेलनेस सेंटर्सनी आधीच सायबर सेलशी करार केला आहे आणि संपूर्ण गोव्यातील विविध सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यास मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सायबर वेलनेस सेंटर्सना पूर्ण सहकार्य दिले आणि सायबर गुन्ह्यांमध्ये पुढील वैद्यकीय उपचारांसाठी गृह विभाग, आरोग्य सेवा, जीएमसी किंवा आयपीएचबी यांच्याकडून मदतीचे आश्वासन दिले.
सोनाली पाटणकर यांनी आपल्या भाषणात सायबर वेलनेस सेंटर हे एकमेव पॉइंट होलिस्टिक रिसोर्स आहे जे ऑनलाइन त्रासावर ३६० डिग्री प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय प्रदान करते असे सांगितले. गोवा सायबर सुरक्षित बनविण्याच्या दिशेने काम करण्यासाठी सायबर वेलनेस सेंटरचे आयोजन करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. हे सायबर वेलनेस सेंटर ऑनलाइन त्रास, इंटरनेट व्यसनासाठी मूल्यांकन आणि उपचार, सायबर धोक्यांशी संबंधित तांत्रिक उपाय, मुले आणि प्रौढांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी आणि संपूर्ण गोव्यात डिजिटल साक्षरता आणि ऑनलाइन सुरक्षिततेवर शैक्षणिक कार्यक्रम यासाठी मानसिक आधार आणि समुपदेशन प्रदान करील.
यावेळी जीएससीपीसीआरचे अध्यक्ष श्री पीटर बोर्गेस, संस्थापक रिस्पॉन्सिबल नेटिझम सोनाली पाटणकर, श्री उमेश जोशी, वैशाली भागवत आणि शिक्षण, कायदा अंमलबजावणी आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.