Connect with us

गोवा खबर

ब्लूम ते व्हॉईस ऑफ नेचर आणि ड्रम्स ऑफ इंडिया या सांस्कृतिक सादरीकरणांनी 57 इफ्फीच्या समारोप सोहळ्यात सळसळले चैतन्य

Published

on

Spread the love


तीन सांस्कृतिक सादरीकरणांतून सीमांच्या पलीकडे जात एकाच लयीत रुजणाऱ्या आणि बहरणाऱ्या कथांचा गौरव

गोवा खबर:गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीच्या (IFFI – International Film Festival of India) 2026 च्या समारोप सोहळ्यात कल्पनाशक्ती, निसर्ग आणि सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सादर झालेल्या तीन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सीमाविरहित कथा ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पनेला पुन्हा मुर्त रुप मिळवून दिले. 

ब्लूम: स्टोरीज दॅट टेक रूट, स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स या काव्यमय नृत्य सादरीकरणाने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. या सादरीकरणातून फुलांचे बहरणे आणि कथांचा प्रवास यांतले साम्य दाखवण्यात आले. ज्याप्रमाणे फूल एक एक पाकळी उलगडत नवे रंग आणि दृष्टिकोन समोर आणते, त्याचप्रमाणे कथा विविध संस्कृती आणि अनुभवांतून उगम पावतात आणि सीमांच्या पलीकडे जात लोकांना परस्परांशी जोडतात अशी मांडणी या सादरीकरणातून केली गेली. भारतीय आणि पाश्चात्त्य नृत्य परंपरांचा समकालीन अभिव्यक्ती आणि हवाई नृत्यासोबतचा संगम या सादरीकरणातून साधला गेला. या सादरीकरणातील कलाकारांनी गुलाबाच्या पाकळ्यांपासून प्रेरित वेशभूषा परिधान केली होती. या सादरीकरणाअंतर्गत रंगमंचावर झालेले फुलपाखरांचे आगमन हे सर्जनशीलतेचा प्रसार, स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्तीच्या अमर्याद शक्यतांचे प्रतीक ठरले.

फुलणाऱ्या फुलाच्या प्रतिमा साकारणाऱ्या सादरीकरणानंतर, संध्याकाळाच्या वातावरणात निसर्गविश्वातील ध्वनींचे सूर निनादले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायन कलाकार मिस्टिक पापिझ यांनी व्हेन नेचर स्पीक्स, स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स हे सादरीकरण केले. चार सप्तकांच्या स्वरविस्तारासाठी ओळखल्या जाणाऱ्या पापिझ यांनी आपल्या आवाजातून पानांची सळसळ, पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट आणि नद्यांच्या प्रवाहाचे जिवंत विश्व उभे केले. गॉट टॅलेंट या कार्यक्रमाच्या विविध आंतरराष्ट्रीय आवृत्त्यांमध्ये चार वेळा गोल्डन बझर मिळवलेल्या पापिझ यांनी आपल्या सादरीकरणातून निसर्गापासून प्रेरित ध्वनी, प्राचीन आध्यात्मिक परंपरा आणि समकालीन गायन कला यांचा संगम साधला. आपल्या सादरीकरणातून त्यांनी मानवता आणि निसर्गामधील शांतता आणि सौहार्दाची सांगीतिक अभिव्यक्ती सादर केली.

‘ड्रम्स ऑफ इंडिया’ या संगीताविष्काराने या सोहळ्याची सांगता झाली. भारतासह जगाच्या विविध भागांतील तालवाद्यांच्या ठेक्यांचा अनोखा संगम या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. मृदंगम, तबला, नाशिक ढोल, पंजाबी ढोल, चेंडा, ढोलू आणि थमाटे या पारंपरिक भारतीय वाद्यांसोबत आफ्रिकेतील जेम्बे आणि टिंबेल्स, तसेच ऑस्ट्रेलियातील डिड्जेरिडू या वाद्यांचा समावेश होता. लिक्विड ड्रमिंग, बीटबॉक्सिंग आणि बासरीच्या सुरांची जोड मिळाल्याने विविध संगीतपरंपरांचा एक चैतन्यमय तालमेळ या सादरीकरणातून साकारला.

या तीनही सादरीकरणांतून कलेचा एक सुंदर प्रवास उलगडला. कथांच्या बहरापासून आणि निसर्गाच्या स्वरांपासून सुरू झालेला हा प्रवास अखेरीस तालांच्या सामूहिक ऊर्जेपर्यंत पोहोचला. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 57 व्या आवृत्तीची ‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ (Stories Without Borders) ही संकल्पना या सादरीकरणांतून प्रभावीपणे प्रतिबिंबित झाली. नृत्य आणि संगीत या कलाप्रकारांना भाषेच्या आणि भौगोलिक सीमांचे बंधन नसते, तर ते विविध संस्कृतींच्या कलाविष्कारांना एकाच मंचावर आणू शकतात, हे या कार्यक्रमांनी दाखवून दिले.

Continue Reading