Connect with us

गोवा खबर

तुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नियंत्रण ठेवतोय का? तमिळ थरारपट ‘स्क्रोल’मधून इफ्फी 2026 मध्ये डिजिटल धोक्याचा इशारा

Published

on

Spread the love


प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी नामांकन; संपूर्ण चित्रपट स्मार्टफोनच्या स्क्रीनवर बेतलेला

“उपदेश न करता विचार करायला लावणारा थरारपट”: ‘स्क्रोल’ आणि डिजिटल व्यसनाच्या धोक्यांविषयी दिग्दर्शक कन्नन एस यांचे मत

गोवा खबर:आपण क्षणभरासाठी मोबाईल चाळतो (स्क्रोल करतो); पण त्यात तासनतास गुंतून राहतो. पुढच्या नोटिफिकेशनची वाट पाहतो आणि सतत स्क्रीनवर बोट फिरवत राहतो. पण हाच स्क्रीन आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू लागला तर काय होईल? या अस्वस्थ करणाऱ्या शक्यतेचा वेध तमिळ चित्रपट ‘स्क्रोल’ घेतो. गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सादर झालेला हा चित्रपट स्मार्टफोनचे व्यसन, अल्गोरिदमच्या माध्यमातून होणारे मॅनिप्युलेशन आणि डिजिटल गुलामगिरी या विषयांवर भाष्य करतो.

दिग्दर्शक-निर्माते कन्नन एस आणि प्रमुख कलाकार अरविंद सुंदर आणि काव्या अनिल यांनी महोत्सवानिमित्त पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या वेगळ्या कथनशैलीविषयी, प्रायोगिक चित्रपटनिर्मिती तंत्राविषयी आणि समकालीन विषयांविषयी माहिती दिली.

‘इंडियन पॅनोरमा’ विभागात निवड झालेला ‘स्क्रोल’ (Scroll) हा इफ्फी 2026 मध्ये ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी पदका’साठी नामांकन मिळालेला एकमेव तमिळ चित्रपट आहे. 128 मिनिटांच्या या मानसशास्त्रीय थरारपटात नावीन्यपूर्ण ‘स्क्रीन-लाइफ’ शैलीचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण कथानक मोबाईल फोनच्या स्क्रीनवरच उलगडते.

हा चित्रपट स्मार्टफोनच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची कथा सांगतो. आपल्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी तो एक ॲप डाउनलोड करतो. सुरुवातीला या ॲपमध्ये काही कामे पूर्ण केल्यास बक्षिसे मिळतात आणि त्यातून डिजिटल व्यसनातून मुक्त होण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, लवकरच हा तरुण अस्वस्थ करणाऱ्या आव्हानांच्या आणि मानसिक दबावाच्या चक्रात अडकत जातो.

आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी चित्रपटाच्या नामांकनाबद्दल बोलताना, दिग्दर्शक कन्नन एस यांनी वाढत्या तंत्रज्ञान-आधारित जगात सत्य, अहिंसा आणि आत्मसंयम या गांधीवादी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ब्लू व्हेल चॅलेंजसारख्या वास्तविक डिजिटल घटनांपासून प्रेरणा घेऊन, हा चित्रपट तयार केल्याचे त्यांनी सांगितले. उपदेशात्मक शैलीचा वापर न करता डिजिटल तंत्रज्ञानावरील अनियंत्रित अवलंबित्वाबाबत तरुण प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा चित्रपटाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. “ व्याख्यान देण्याऐवजी एका उत्कंठावर्धक थ्रिलरद्वारे प्रभावी सामाजिक संदेश द्यायचा होता,” असे त्यांनी नमूद केले.

कन्नन यांनी संपूर्ण चित्रपट मोबाईल फोनच्या स्क्रीनवरील दृश्यांच्या माध्यमातून साकारण्यातील आव्हानांबद्दलही सांगितले. बहुतेक कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वतंत्रपणे आपापल्या भागांचे चित्रीकरण केले. महोत्सवात भेटण्यापूर्वी अनेक कलाकारांची प्रत्यक्ष भेटही झाली नव्हती असे त्यांनी सांगितले. “कथानकाची उत्कंठा आणि प्रभाव कायम ठेवत मोबाईलच्या मर्यादित स्क्रीनवर चित्रपटाला आवश्यक असलेला नाट्यमय ताण टिकवून ठेवणे, हे सर्वात मोठे आव्हान होते,” असे त्यांनी सांगितले.

चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे मुख्य अभिनेता अरविंद सुंदर यांनी स्मार्टफोनच्या व्यसनावर मात करण्यासाठी पुन्हा एका ॲप्लिकेशनचा वापर करण्यात येईल विरोधाभासावर भाष्य केले. या भूमिकेच्या तयारीसाठी दैनंदिन जीवनातील अनुभवास पुरेसे ठरल्याचे त्यांनी सांगितले. “आपण दररोज या वास्तवाचा सतत सराव करत असतो.” असे ते म्हणाले. चित्रपटाच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे प्रेक्षकांना नायकाच्या कोंडमारा करणाऱ्या डिजिटल विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, असे त्यांनी सांगितले.

काव्या अनिल यांनी पटकथेच्या अपारंपरिक कथानकावर आणि समकालीन प्रासंगिकतेवर प्रकाश टाकला. हा चित्रपट हानिकारक डिजिटल आव्हानांचे उदात्तीकरण करत नाही किंवा त्यांच्या परिणामांचे अतिरंजीत चित्रणही करत नाही. उलट तो तंत्रज्ञानाच्या माणसांना एकमेकांशी जोडण्याच्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेचे विचारप्रवर्तक परीक्षण सादर करतो, असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन सुरेश कुमार एम यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा: 

Continue Reading