Connect with us

गोवा खबर

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विविधीकरण आणि आधुनिक शेती पद्धती महत्त्वाच्या :मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्यातील कृषी पायाभूत सुविधा आणि शेतकरी साहाय्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाळपई येथे नव्याने बांधलेल्या विभागीय कृषी कार्यालयाचे उद्घाटन केले. २.७० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या सुविधेमुळे, संपूर्ण विभागातील शेतकऱ्यांना कृषी योजना, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक सरकारी सेवा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील असे ते म्हणाले.

गोवा सरकारच्या तळागाळातील विकासावरील लक्ष अधिक दृढ करीत हे नवीन कार्यालय कृषी योजनांच्या अंमलबजावणीस मदत करील, आधुनिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देईल आणि तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षणाची उपलब्धता वाढवेल. या कार्यक्रमात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना कृषी लाभ आणि सहाय्य मिळवणे सोपे व्हावे यासाठी कृषी कार्डांचे वितरणही केले.

उपस्थितांना संबोधित करताना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या सात वर्षांतील शेतकरी कल्याण आणि कृषी विकासासाठी सरकारच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांनी शेतकरी समुदायाला सहकार्य करण्यासाठी सुधारित धान्य खरेदी दर, अनुदान, कृषी कार्ड, मृदा आरोग्य कार्ड आणि सामुदायिक शेती यांच्या भूमिकेवर जोर दिला. स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत कृषी उपक्रमांमध्ये विविधता आणण्याच्या गरजेवर भर देत त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भाजीपाला लागवड, फुलशेती आणि हळद शेतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी गोव्याचे कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी जैवविविधता केंद्रे आणि शाश्वत शेती पद्धतींच्या महत्त्वावरही भर दिला.

कृषी विविधीकरणावर आपले लक्ष केंद्रित असल्याचे सांगून  वाळपई येथील विभागीय कृषी कार्यालयाने २०२५-२६ दरम्यान अनेक शेतकरी-केंद्रित उपक्रम हाती घेतले. सत्तरी शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून, ८०,००० झेंडूची रोपे, ८०,००० काजूची कलमे, ७०० लिंबाची रोपे, ३,००० आंब्याची रोपे आणि १०,००० सुपारीच्या रोपांचे वितरण सुलभ केले. जनजागृती कार्यक्रम १४ बचत गटांपर्यंत आणि अंदाजे ३५० शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर १०० शेतकऱ्यांना पाम तेलाच्या लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. इतर उपक्रमांमध्ये ट्रायगोना मधमाशी पालन, मृदा परीक्षण आणि मातीचे नमुने घेणे यांचा समावेश होता.

शेतकरी आणि ग्रामीण समुदायांना व्यावहारिक मदतीचा विस्तार करीत, कार्यालयाने ३८० आर्द्रतामापकांचे (हायग्रोमीटर) वाटप केले, २० तरुणांना विमा संरक्षणासह नारळाच्या झाडवर चढण्याचे प्रशिक्षण दिले आणि तीन ट्रॅक्टरच्या माध्यमातून कृषी यंत्रसामग्री भाड्याने देण्याची सोय केली. अंदाजे २१० कुंपण घालण्याच्या, ४५ सिंचनाच्या आणि १८४ कृषी यंत्रसामग्रीच्या प्रकरणांमधूनही मदत देण्यात आली. गोळावली आणि ठाणे येथील सामुदायिक शेती उपक्रमांचा उद्देश पडीक जमिनीचे पुनरुज्जीवन करणे हा होता, तर माळोलीतील ४० पशुपालकांमध्ये बायोगॅसचा प्रचार, कृषी यंत्रसामग्री देखभाल कार्यशाळा आणि पारंपारिक पुरणशेतीचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांनी सत्तरीतील कृषी विकासात अधिक योगदान दिले.

या कार्यक्रमाला पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे, कृषी सचिव, आयएएस श्री निखिल देसाई, कृषी संचालक श्री चंद्रहास देसाई, समाजसेवक श्री प्रेमनाथ दळवी, होंडा जिल्हा पंचायतीचे सदस्य श्री नामदेव,  श्रीमती प्रतिभा नाईक, समाजसेवक श्री विनोद शिंदे, सरपंच, पंच सदस्य, शेतकरी, कृषी अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.