Connect with us

गोवा खबर

गोव्यात उष्णतेचा तडाखा वाढला; पणजीत पारा ३६ अंशांपार, सलग तीन दिवस यलो अलर्ट!

Published

on

Spread the love


गोवा खबर :गोव्यात उष्णतेचा तडाखा वाढला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पणजीत तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामान निर्माण झाले आहे. हवामान विभागाने १३, १४ आणि १५ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी गोव्यात यलो अलर्ट जारी केला आहे.


वातावरणातील प्रति-चक्रीवादळ स्थिती (अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशन) आणि हवेतील वाढलेली आर्द्रता यामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तापमान वाढल्याने आणि हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागत आहे.


पणजीतील आल्तिनो येथील हवामान केंद्राने जारी केलेल्या अंदाजानुसार, उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्ह्यांत १५ ऑक्टोबरपर्यंत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. तिन्ही दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.


दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी काही घाट परिसरांत अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


गोव्यात ऑक्टोबर महिन्यातही उन्हाचा तडाखा जाणवत असून, वाढते तापमान आणि दमट हवामानामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. पुढील तीन दिवस उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे