Connect with us

गोवा खबर

प्रसार भारतीच्या गोवा विभागात हिंदी पंधरवड्याची सांगता

Published

on

Spread the love


विविध स्पर्धांतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळ्यात सत्कार

गोवा खबर:प्रसार भारतीच्या गोवा विभागात 14 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या हिंदी पंधरवड्याची आज सांगता झाली. यानिमित्ताने आयोजित समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

‘आमची भाषा, आमची ओळख’ या संकल्पनेवर आधारित हिंदी पंधरवड्यादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला गोवा पत्र सूचना कार्यालयाचे संचालक श्री. नाना मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसार भारती, गोव्याचे उपमहासंचालक तथा क्लस्टर प्रमुख श्री. संदीप श्रीवास्तव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी प्रसार भारतीचे उपसंचालक श्री. विमलन जे. यांचीही उपस्थिती होती.

केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये व विभागांमध्ये हिंदी भाषेच्या अधिकाधिक वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार दरवर्षी हिंदी पंधरवडा साजरा केला जातो. या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेत अधिकाधिक कामकाज करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

कार्यक्रमाचे संचालन व समन्वय प्रसार भारती, गोव्याचे सहायक संचालक तथा राजभाषा अधिकारी श्री. पियुष गौतम यांनी केले.