Connect with us

गोवा खबर

गोवा जहाजबांधणी केंद्राची 2025-26 या आर्थिक वर्षात दमदार कामगिरी

Published

on

Spread the love


उत्पन्नाने ओलांडला 4,000 कोटी रुपयांचा टप्पा, करपूर्व नफ्यात 17 टक्क्यांनी वाढ होऊन  442 कोटी रुपयांवर पोहोचला, नोंदणीकृत मागणी विषयक नोंद पुस्तिकेच्या  मूल्यानेही ओलांडला 13,000 कोटी रुपयांचा टप्पा

Posted On: 25 SEP 2026 7:12PM by PIB Mumbai

गोवा खबर:केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या जहाजबांधणी कंपनीने 2025-26 या आर्थिक वर्षात आर्थिक आणि कार्यान्वयनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. या कालावधीत कंपनीने एकूण 4,000 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला, यासोबतच तर कंपनीच्या नोंदणीकृत मागणी विषयक नोंद पुस्तिकेचे (Order Book – हाती असलेल्या एकूण कामांचे मूल्य) मूल्यही 13,000 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

गोवा शिपयार्ड लिमिटेडची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, दि. 25 सप्टेंबर रोजी आभासी पद्धतीने पार पडली. गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश कुमार उपाध्याय हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत 2025-26 या  आर्थिक वर्षाची लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रे मंजूर करण्यात आली.

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश कुमार उपाध्याय यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले. कंपनीच्या कामकाजातून मिळणारे महसूल उत्पन्न गेल्या वर्षाच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढून 3,764 कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. या काळात कंपनीचे एकूण उत्पन्न 4,004 कोटी रुपये इतके होते, तर करपूर्व नफ्यात 17 टक्क्यांनी वाढ होऊन ते 442 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. व्याज, कर, घसारा आणि रोखीकरणापूर्वीची कमाई  522 कोटी रुपये इतके होते, तर कंपनीचे निव्वळ मूल्य 1,936 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याचे ते म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत या जहाजबांधणी कंपनीच्या आर्थिक कामगिरीत लक्षणीय वाढ झाली आहे, 2021-22 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न  865 कोटी रुपये इतके होते, त्यात वाढ होऊन 2025-26 मध्ये वाढ होऊन ते 4,004 कोटी रुपयांवर पोहोचले असल्याची माहिती दिली. याच कालावधीत करपूर्व नफा देखील 135 कोटी रुपयांवरून 442 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे ब्रिजेश कुमार उपाध्याय यांनी सांगितले.

2025-26 हे आर्थिक वर्ष गोवा शिपयार्ड लिमिटेडसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरल्याचे उपाध्याय यावेळी म्हणाले. हे आर्थिक वर्ष प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी आणि पूर्तता, तसेच या जहाजबांधणी कंपनीच्या क्षमता विस्तारासाठी ओळखले जाईल असे मत त्यांनी व्यक्ते केले. या कामगिरीमुळेच 2 मार्च 2026 रोजी कंपनीला केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत  अनुसूची ब वरून  अनुसूची अ  हा दर्जा दिला गेल्याची माहितीही त्यांनी दिली. कंपनीच्या दर्जामध्ये झालेली ही वाढ कंपनीच्या आजवरच्या प्रगतीशील वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे त्यांनी नमूद केले.

31 मार्च 2026 पर्यंत कंपनीच्या हाती असलेल्या कामांचे एकूण मूल्य दर्शवणारी नोंदणीकृत मागणी विषयक नोंद पुस्तिकेचे (Order Book) मूल्य 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते, असेही उपध्याय यांनी उपस्थितांना सांगितले. नौदलासोबत झालेल्या मोठ्या मूल्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे या नोंदणीकृत मागणी विषयक नोंद पुस्तिकेचे मूल्य सुमारे 32,400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे भविष्यातील जहाजबांधणी प्रकल्पांना अधिक नेमकी दिशा आणि स्थैर्य लाभेल असे ते म्हणाले.

जीएसएल’ने भारतीय नौदलासाठी फ्रिगेट्स आणि नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स (एनजीओपीव्ही) यांसह प्रमुख जहाजबांधणी प्रकल्पांमध्ये प्रगती कायम ठेवली आहे. 31 मार्च 2026 रोजी पहिल्या एनजीओपीव्ही) चे यशस्वी जलावतरण हा गोवा शिपयार्डसाठी महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. 

भारतीय तटरक्षक दलासाठीच्या प्रकल्पांमध्येही शिपयार्डने महत्त्वाचे टप्पे गाठले. यामध्ये 23 डिसेंबर 2025 रोजी पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज आयसीजीसी समुद्र प्रताप तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आले. याशिवाय, 2025 मध्ये जीएसएल ने भारतीय तटरक्षक दलाला 4 जलद गस्तीची जहाजे सुपूर्द केली.

या वर्षात जीएसएलची निर्यात उलाढाल 55 टक्क्यांनी वाढून 127 कोटी रुपये झाली. निर्यातीशी संबंधित महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये परदेशी नौदलासाठी 4,000 टन क्षमतेच्या फ्लोटिंग ड्राय डॉकचे जलावतरण, युरोपमधील ग्राहकासाठी ड्रेजरच्या बांधणीसाठी किल लेइंग आणि 27 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेशेल्स तटरक्षक दलाला ‘LESPWAR’ हे जलद गस्ती जहाज सुपूर्द करणे यांचा समावेश आहे, असे उपाध्याय यांनी सांगितले.

‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून, जीएसएल ने भारतीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्सकडून खरेदीला प्राधान्य देत स्वदेशी सामग्रीचे प्रमाण वाढविण्यावर भर कायम ठेवला. कंपनीने आरोग्यसेवा, शिक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रांतील कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांवर 6.61 कोटी खर्च केल्याची माहिती उपाध्याय यांनी दिली.

वार्षिक सर्वसाधारण सभेत जीएसएल ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 171 टक्के अंतिम लाभांश जाहीर केला. हा लाभांश प्रति समभाग 8.55 रुपये इतका आहे. मागील आर्थिक वर्षात हा लाभांश प्रति समभाग 7.65 रुपये होता. कंपनीची प्रति समभाग कमाई (ईपीएस) वाढून 28.47 रुपये झाली आहे.

या बैठकीला कंपनीचे संचालक, कंपनी सचिव, लेखापरीक्षक आणि भागधारक उपस्थित होते.