Connect with us

गोवा खबर

नॅशनल मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये एम्स नागपूरच्या निवासी डॉक्टरने जिंकली तीन पदके

Published

on

Spread the love


डॉ.अनुवा कपूर दुसऱ्या एशियन मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी पात्र

गोवा खबर:एम्स नागपूरमधील कम्युनिटी मेडिसिनच्या एमडी अंतिम वर्षाच्या निवासी डॉक्टर डॉ.अनुवा कपूर यांनी 22 व्या नॅशनल मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन पदके जिंकल्याबद्दल एम्स नागपूरने त्यांचे अभिनंदन केले. हरियाणातल्या बहादूरगड इथल्या चॅम्पियन ॲक्वाटिक्स अकादमी येथे 11 ते 13 सप्टेंबर 2026, या कालावधीत ही जलतरण स्पर्धा झाली.भारतीय जलतरण महासंघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना डॉ.अनुवा कपूर यांनी 400 मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात सुवर्ण आणि 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक पटकावले. या शिवाय महिलांच्या सांघिक 4×50 मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात त्यांनी रौप्य पदक जिंकले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्या 3 ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान बेंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या एशियन मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरल्या आहेत.

डॉ.अनुवा कपूर यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकात क्रीडा क्षेत्रात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी, एम्स  नागपूरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रा. प्रशांत पी. जोशी यांनी, त्यांचे कौतुक केले. तसेच, आगामी एशियन मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.अनुवा कपूर यांनी कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या निरंतर पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या यशामुळे एम्स नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रातही उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे  प्रयत्न यातून अधोरेखित झाले आहेत.