Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गणेश चतुर्थीच्या शुभ आणि पवित्र प्रसंगी, गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात “गोमंतकीयांसाठी गणेश चतुर्थी हा केवळ एक सण नाही. ही एक भावना, एक परंपरा आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव आहे. प्रत्येक गोमंतकीयांच्या घरात बाप्पाचे आगमन आनंद आणि आशेची लाट घेऊन येते. भगवान गणेश हे बुद्धी, ज्ञान, समृद्धीचे  दैवत आहे. 

या सणाला कुटुंबे एकत्र येतात, समाज एकवटतो आणि संपूर्ण राज्य ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून जाते. यावर्षी आपण बाप्पाचे स्वागत करीत असताना, मी प्रत्येक कुटुंबाला पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची निवड करण्याचे कळकळीचे आवाहन करतो. आपण नैसर्गिक शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तींची निवड करूया आणि हानिकारक प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) कटाक्षाने टाळूया.

“आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी  आपल्याला ‘व्होकल फॉर लोकल’ हा शक्तिशाली मंत्र दिला आहे, या गणेशोत्सवात, आपण स्थानिक वस्तू खरेदी करूया. आपली सजावटीची साधने, मिठाई आणि पूजेचे साहित्य आपल्या स्थानिक गोव्यातील छोट्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करूया. चला, ही चतुर्थी खऱ्या अर्थाने गोव्याची बनवूया आणि स्वयंपूर्ण गोव्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकूया.” असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.