Connect with us

गोवा खबर

गोव्यात मराठीचा प्रभाव वाढला; खरगेंनीही मराठीतून मांडले मुद्दे, काँग्रेसला बदलते वातावरण कळले : सुभाष वेलिंगकर

Published

on

Spread the love

गोवा खबर: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गोव्यात मुद्दे मांडताना मध्येच मराठीतून भाषण केल्याचा उल्लेख करत मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील मराठीच्या प्रभावाबाबत भाष्य केले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही खरगे यांच्यासमोर मराठीतून भाषण केल्याचे वेलिंगकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

“काल एक आश्चर्याची गोष्ट घडली म्हणे! काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपले मुद्दे मांडताना मध्येच मराठीतून देखील भाषण केले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर हे देखील मराठीतून बोलले,” असे वेलिंगकर यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

खरगे आणि चोडणकर यांच्यासमोर ख्रिश्चन तसेच मुस्लिम मतदार उपस्थित असतानाही त्यांनी मराठीचा वापर केल्याकडे वेलिंगकर यांनी विशेष लक्ष वेधले. यावेळी कोणाकडूनही आक्षेप घेण्यात आला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसला मराठी वातावरणाची जाणीव झाल्याचा दावा

गोव्यात निर्माण झालेल्या मराठीच्या वातावरणाची काँग्रेसला जाणीव झाली असल्याचे वेलिंगकर यांनी म्हटले आहे. मराठीच्या मुद्द्यामुळे राजकीय पक्षांच्या भूमिकेत बदल दिसत असल्याचा सूर त्यांनी आपल्या पोस्टमधून लावला.

त्याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. मराठी भाषिक मतांवर आतापर्यंत निवडून येऊन सत्तास्थानी पोहोचलेल्या भाजपने मात्र मराठीच्या प्रश्नावर वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

“मराठी वातावरण निर्माण झालेले काँग्रेसला कळते. पण मराठी हिंदू मतांवरच आतापर्यंत निवडून येऊन सत्तास्थानी पोहोचलेल्या भाजपने मात्र डोळ्यांवर कातडे ओढून घेऊन विनाशाकडे वाटचाल सुरू केली आहे,” अशी टीका वेलिंगकर यांनी केली.

वेलिंगकर यांच्या या वक्तव्यामुळे गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसोबतच आता राजकीय पक्षांच्या मराठीबाबतच्या भूमिकेचीही चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आली आहे.