Connect with us

गोवा खबर

खर्गेंच्या उपस्थितीत १७ ऑगस्टला वेर्ण्यात काँग्रेसची सभा; परवानगीसाठी सरकारकडून अडवणूक : गिरीश चोडणकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सोमवार, १७ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर येणार असून पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेला परवानगी देण्यासाठी सरकारकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी खर्गे यांच्या गोवा दौऱ्याची माहिती दिली. मडगाव, पणजी आणि सांताक्रूझ अशा विविध ठिकाणी सभेसाठी परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आल्याने अखेर वेर्णा येथे सभा निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

चोडणकर म्हणाले की, भाजपचे मंत्री मिलिंद नाईक किंवा भाजपच्या इतर नेत्यांनी आपल्या सभेला विरोध करण्याबाबत आपल्याला भेटलेले नाही. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अशा प्रकारच्या बातम्या येणार असून त्यावर योग्य वेळी उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खर्गे उत्तराखंडमधील एका कार्यक्रमाला गेल्यानंतर भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याने त्यांच्यावर टीका केल्याचा उल्लेखही चोडणकर यांनी केला. खर्गे यांनी त्या टीकेला आपल्या विचारसरणीतून उत्तर दिले असून हीच काँग्रेसची विचारसरणी असल्याचे ते म्हणाले.

आगोर मैदान येथे सभा

खर्गे १७ ऑगस्ट रोजी गोव्यात येणार असून त्यांच्या सभेसाठी आगोर मैदान, वेर्णा हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी मडगावातील रवींद्र भवन परिसर, पणजीतील आझाद मैदान तसेच सांताक्रूझ येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे परवानगी मागण्यात आली होती. मात्र परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

खड्ड्यांच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलनाचा इशारा

राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याचे सांगत काँग्रेसने सरकारला दिलेली तीन दिवसांची मुदत संपल्याचे चोडणकर यांनी सांगितले. सरकारने प्रश्न सोडवला नाही तर काँग्रेस पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो काढून ते सरकारला पाठविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

एसटी आरक्षणावर काँग्रेसची भूमिका

गोव्यात अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षण अद्याप प्रत्यक्ष लागू झालेले नसल्याचा दावा चोडणकर यांनी केला. देशातील इतर राज्यांमध्ये एसटी समाजासाठी राजकीय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी गोव्यातील १३ टक्के एसटी समाज प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपने प्रस्तावित आरक्षित मतदारसंघ कोणते असतील हे जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

‘१३० कोटींच्या खाण जेट्टी’बाबत स्पष्टीकरणाची मागणी

१३० कोटी रुपयांच्या खाण जेट्टीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही, असा आरोप काँग्रेसने केला. मुख्यमंत्री दरवेळी गाडी बदलत असल्याची टीका करत या विषयावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

खर्गेंच्या सभेसाठी क्रीडा खात्याकडे अर्ज नसल्याचे तवडकरांचे स्पष्टीकरण

दरम्यान, क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी काँग्रेसने खर्गे यांच्या सभेसाठी क्रीडा खात्याकडे परवानगी मागितलेली नसल्याचे सांगितले. परवानगी मागितली असती तर अर्ज शेवटी आपल्याकडे आला असता; मात्र असा कोणताही अर्ज आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.