Connect with us

गोवा खबर

गोवा काँग्रेसकडून सर्व ४० विधानसभा मतदारसंघांची रणनीती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांच्या प्रतिनिधींची व्यापक रणनीती व संघटन बळकटीकरण बैठक आज मडगाव येथील ग्रेस मॅजेस्टिक हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक सक्षम करण्यासोबतच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ठोस नियोजन करण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोव्यासाठीचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी माणिकराव ठाकरे होते. यावेळी व्यासपीठावर गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच कार्याध्यक्ष एम. के. शेख, अॅड. कार्लुस अल्वारीस फेरेरा, अल्टोन डी’कोस्टा आणि सुनील कवठणकर उपस्थित होते.

बैठकीला जिल्हाध्यक्ष आसिस नॉरोन्हा, राजेश वेरेकर, शशांक नार्वेकर आणि मंगलदास नाईक, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिक्षा खलप, गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आर्चित नाईक, सेवादलचे मुख्य संघटक राजन घाटे तसेच प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांचे ब्लॉक अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य तसेच प्रमुख पदाधिकारी यांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक मतदारसंघातील संघटनात्मक स्थिती, स्थानिक पातळीवरील अडचणी, जनतेशी असलेला संपर्क आणि आगामी काळातील पक्षाच्या कार्यक्रमांबाबत पदाधिकाऱ्यांनी आपली मते, सूचना व महत्त्वपूर्ण बाबी नेतृत्वासमोर मांडल्या.

बैठकीत बूथ पातळीवरील संघटना अधिक मजबूत करणे, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे, जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करणे, यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी काँग्रेस नेतृत्वाने पक्षात एकजूट, शिस्त, सामूहिक जबाबदारी आणि जनतेशी सातत्यपूर्ण संवाद यांचे महत्त्व अधोरेखित केले. गोव्यातील जनतेशी संबंधित प्रश्न अधिक आक्रमकपणे आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच राज्यभर काँग्रेसची अधिक सक्षम, संवेदनशील आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधील संघटना उभी करण्यासाठी आवश्यक रणनीतीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलेला उत्साह आणि उत्स्फूर्त सहभाग हा पक्ष संघटनेतील नवीन ऊर्जा, बांधिलकी आणि आगामी निवडणुकांसाठीची सज्जता दर्शविणारा ठरला. राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमधून नेते आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा झालेला सक्रिय सहभाग हा गोवा काँग्रेसला प्रत्येक स्तरावर अधिक मजबूत करण्यासाठीची सामूहिक इच्छाशक्ती अधोरेखित करणारा होता.

बैठकीचा समारोप सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरणात झाला. पक्षाच्या संघटनात्मक तयारीबाबत आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या नव्या उत्साहाबाबत काँग्रेस नेतृत्वाने समाधान व्यक्त केले. एकजूट, सेवा आणि जनतेप्रती बांधिलकीचा काँग्रेसचा संदेश गोव्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नव्या निर्धाराने एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन नेतृत्वाने केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. के. शेख यांनी केले, तर अमरनाथ पणजीकर यांनी आभार प्रदर्शन केले.