Connect with us

गोवा खबर

मुंबईतील अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण अक्षमता (दिव्यांगजन) संस्थेतर्फे पहिल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुंबईतील अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण अक्षमता (दिव्यांगजन) संस्थेने [AYJNISHD(D)] आपल्या 43 वर्षांच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत 8 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या पहिल्या मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमात देशभरातील 122 माजी विद्यार्थी एकत्र आले, जे सुरुवातीच्या वर्षांतील तुकड्यांपासून ते नुकत्याच पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंतचे प्रतिनिधित्व करत होते.

संस्थेचे संचालक डॉ. सुमन कुमार यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केल. हे विद्यार्थी घरी आल्याची भावना व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांच्या अधिक मजबूत जाळ्याची ही सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा, शिक्षण, संशोधन, पुनर्वसन, प्रशासन आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये दिलेल्या मौल्यवान योगदानाचा विशेष उल्लेख त्यांनी केला.

डॉ. कुमार यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, संशोधन, नवोपक्रम, अंतर्वासिता, अतिथी व्याख्याने, रोजगाराच्या संधी आणि इतर संस्थात्मक उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेत सक्रियपणे योगदान देण्यास प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रस्तावित एवायजे माजी विद्यार्थी संघटनेची ओळख करून देणे हे होते. अविचल अंबुलकर यांना अध्यक्ष, राम सुब्रमण्यम यांना उपाध्यक्ष, हेतल शाह यांना सदस्य सचिव, आफरीन संधू यांना सहसचिव आणि इम्रान सिद्दिकी यांना खजिनदार म्हणून प्रस्तावित करण्यात आले. डॉ. डॅनियल जोहानस, डॉ. शिवराज भीमते, पल्लवी वासे आणि तस्नीम मनसावाला यांना कार्यकारी समिती सदस्य म्हणून प्रस्तावित करण्यात आले.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांची भाषणे, शिक्षकांचा सत्कार, आयोजन समितीचा गौरव, संवादात्मक उपक्रम आणि सहभागींचे स्नेहसंमेलन यांचाही समावेश होता. माजी विद्यार्थ्यांनी संस्थेशी जोडलेले राहण्याची तसेच माजी विद्यार्थी मेळाव्याला वार्षिक कार्यक्रम म्हणून पाठिंबा देण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली.

“पिढ्यांमधील समन्वय – आजीवन प्रभाव” या भावनेने माजी विद्यार्थी आणि संस्था यांच्यातील नव्या भागीदारीची या मेळाव्याने सुरुवात झाली.