गोवा खबर : सावर्डे मतदारसंघातील युवा नेते संकेत आर्सेकर यांनी काळे सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःची शालेय बस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पोहोचण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आर्सेकर यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थी शाळा सुटल्यानंतरही वाहतुकीच्या अडचणींमुळे दुपारी उशिरा घरी पोहोचतात. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच शालेय बस सेवा सुरू करण्यात येईल.
दरम्यान, कालिदास रामा गावस देसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे काळे सरकारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना संकेत आर्सेकर यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची भूमिका मांडत, सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी मंत्री दीपक पाऊसकर, विलास गावस देसाई, किशोर गावस देसाई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि सायकलींचे वितरण करण्यात आले.