गोवा खबर: ‘व्हिजन वर्ल्ड’तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा बहुचर्चित गोवा मराठी चित्रपट महोत्सव (GMFF) यंदा ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ रोजी पणजी येथे होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ आणि सिनेरसिकांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगणार असून, चित्रपटप्रेमींसाठी तो विशेष आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवात निवडक आणि दर्जेदार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, विशेष प्रीमियर शो, दिग्दर्शक व कलाकारांशी संवाद, चर्चासत्रे तसेच विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे प्रेक्षकांना चित्रपट निर्मिती प्रक्रियेविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
तसेच नवोदित दिग्दर्शक आणि कलावंतांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मराठी चित्रपटसृष्टीला व्यापक संधी निर्माण करून देणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
गोव्यातील मराठी चित्रपट रसिकांसाठी हा महोत्सव पुन्हा एकदा मनोरंजन, कला आणि सर्जनशीलतेचा उत्सव ठरणार आहे.