गोवा खबर : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) गोवा केंद्राने 22 जून ते 28 जून 2026 या कालावधीसाठी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार, 22 जून ते 26 जून दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या जिल्हानिहाय इशारा नकाशानुसार, 22 ते 26 जून या पाच दिवसांसाठी दोन्ही जिल्ह्यांना ‘Alert (Be Prepared)’ अर्थात यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, 27 आणि 28 जून रोजी राज्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला असून कोणताही विशेष इशारा जारी करण्यात आलेला नाही. मात्र, या दोन दिवसांतही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
जिल्हानिहाय पर्जन्यवृष्टी अंदाजानुसार, 22 जून ते 28 जून या संपूर्ण आठवड्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिक, मच्छीमार तसेच डोंगराळ परिसरातील रहिवाशांनी विशेष दक्षता बाळगावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
गोव्यात मान्सून सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.