Connect with us

गोवा खबर

पुढील ५ दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ५ दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पुढील ५ दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाचे वैज्ञानिक आणि प्रमुख नहुष कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनपासून राज्यात पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला होता आणि हवामान कोरडे होते. मात्र, २२ जूननंतर हवामानात बदल होऊन पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जूनअखेरपर्यंत पाऊस कायम राहणार
पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सातत्याने पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

काणकोणमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
गेल्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामध्ये काणकोण येथे सर्वाधिक ५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर इतर अनेक केंद्रांवर ५० मिमी पर्यंत पाऊस नोंदवला गेला आहे.

पावसाची तूट भरून निघण्याची आशा
राज्यात सध्या सरासरीपेक्षा ७०% कमी पाऊस झाला असून आतापर्यंत केवळ १९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, आगामी काळात पाऊस अधिक सक्रिय होणार असल्याने ही तूट लवकरच भरून निघेल, असा विश्वास हवामान खात्याने व्यक्त केला आहे.