Connect with us

गोवा खबर

कर्नाटकातील दोन मुलांचा कुळे येथे नदीत बुडून मृत्यू

Published

on

Spread the love

गोवा खबर : बिंबल-कुळे येथील दूधसागर नदीत बुडून कर्नाटकातील दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ओमकार मंजुनाथ दांदीन (१७) व सागर बसवराज दांदीन (१७, दोघेही रा. गुलेगुड्डा बागलकोट-कर्नाटक) अशी मृत मुलांची नावे असून ते बारावीची परीक्षा देऊन तीन दिवसांपूर्वीच कुळे येथे आपल्या नातेवाइकांकडे आले होते.

रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ओमकार, त्याचा भाऊ संतोष (१५) आणि सागर हे तिघे बिंबल येथे पोहण्यासाठी दूधसागर नदीवर गेले होते. संतोषने दोघांनाही पाण्यात न उतरण्याविषयी बजावले होते, मात्र त्यांनी न ऐकल्यामुळे अत्यंत खोल पाण्यात उतरल्याने पोहता न आल्याने दोघेही बुडाले. त्यांना बुडताना पाहून संतोषने धावत घरी जाऊन आपल्या वडिलांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मडगाव येथे पाठवले. ओमकारचे वडील कुळे येथील एका दुकानात काम करतात तर सागरचे वडील बसवराज हे त्यांचे भाऊ आहेत. याच परिसरात गेल्या आठवड्यातही वास्को येथील चार तरुणांचा दूधसागर नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता.