गोवा खबर : शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कल्याणासाठी कार्य करणे ही भाजपची बांधिलकी असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. फातोर्डा मतदारसंघात भाजप फातोर्डा मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना खतांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात दामू नाईक यांनी फातोर्डा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि सहकार्य करण्यासाठी भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दामू नाईक म्हणाले की, देशाला अन्न पुरविणाऱ्या अन्नदात्यांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.
फातोर्डा मंडळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष गावागावात जाऊन शेतकऱ्यांना मदत केली जात असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सुरू राहतील, असे दामू नाईक यांनी सांगितले.