गोवा खबर : पक्षशिस्तीचा बडगा उगारत काँग्रेसने सरचिटणीस मनिषा उसगावकर आणि सोशल मीडिया समन्वयक शमिला सिद्दीकी यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्ष नेतृत्वावर केलेल्या आरोपांमुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पणजीकर म्हणाले की, अलीकडे पक्षात आढळून आलेल्या शिस्तभंगाच्या घटनांवर चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. संबंधित दोघींनी सोशल मीडियावरून पक्ष नेतृत्वावर टीका करत पक्षाला लक्ष्य केले होते. अशा प्रकारचा बेशिस्तपणा पक्ष सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी पुढील चौकशीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काहीजण सोशल मीडियावरून काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात पक्षाकडे कोणाचाही अधिकृत राजीनामा प्राप्त झालेला नाही, असेही पणजीकर यांनी स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्यावरही पणजीकर यांनी टीका केली. ते स्वतःला काँग्रेसचे मित्र म्हणवतात आणि राष्ट्रीय नेतृत्वासमोरही तसेच सांगतात; मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक ठिकाणी काँग्रेसबद्दल टीकात्मक वक्तव्य करतात, हे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले. अलीकडे वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर टोमणे मारल्याने पक्षात नाराजी निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोव्यातील नद्या, जमिनी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प करत काँग्रेस पक्ष १८ जून क्रांतीदिनाच्या औचित्यावर ‘जनकक्रांती’ अभियान सुरू करणार आहे. याशिवाय ‘गोंय राखण यात्रा’ संपूर्ण राज्यभर राबवली जाणार आहे. या यात्रेद्वारे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच ‘काँग्रेस मांड’ हा आणखी एक उपक्रम हाती घेतला जाणार असून, या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि मते ऐकून घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.