गोवा खबर : मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या सॅपेक टॅकरो विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले आहे. या जागतिक स्पर्धेतील ‘क्वाड्रंट’ प्रकारात भारतीय संघाने जगातील बलाढ्य संघांना टक्कर देत अंतिम फेरीत धडक मारली होती. या घवघवीत यशानंतर भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर मोठ्या जल्लोषात आणि भावुक वातावरणात स्वागत करण्यात आले.
भारतीय सॅपेक टॅकरो महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी बोलताना बाबू कवळेकर यांनी सांगितले की, भारतीय संघाने केलेली ही कामगिरी संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. सॅपेक टॅकरोसारख्या खेळात भारत वेगाने प्रगती करत असून या यशामुळे तरुण खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण होईल. आगामी काळात जपानमध्ये होणाऱ्या आशियाई सॅपेक टॅकरो अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.