गोवा खबर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गोव्यातील हवाई वाहतुकीत जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यांत सुमारे २७.२ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. पर्यटन हंगाम संपणे, आंतरराष्ट्रीय चार्टर विमानांची संख्या घटणे, देशांतर्गत मागणी कमी होणे आणि जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती व वाढलेला प्रवासखर्च ही या घसरणीची मुख्य कारणे मानली जात आहेत.
जानेवारी महिन्यात मोपा आणि दाबोळी या दोन्ही विमानतळांवरून एकूण ११ लाख ८२ हजार ३१६ प्रवाशांची नोंद झाली होती, जी एप्रिल अखेरपर्यंत घटून ८ लाख ६१ हजार २५४ वर आली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या ८६ हजार ४९१ वरून थेट १६ हजार २१६ पर्यंत घसरली असून ही तब्बल ८१ टक्क्यांची घसरण आहे. तर देशांतर्गत प्रवाशांची संख्याही १०.९५ लाखांवरून ८.४५ लाखांवर आली आहे.
दाबोळी विमानतळाने मार्च महिन्यात ५,०८,७८५ प्रवासी हाताळून देशात दहावे स्थान मिळवले होते, पण एप्रिलमध्ये तिथेही घट झाली. दुसरीकडे, मोपा विमानतळ सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याला एकूण ७७७ कोटी रुपयांचा प्रचंड तोटा झाला आहे. जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. च्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये १४८.३ कोटी, २०२३-२४ मध्ये ३६३.३ कोटी, २०२४-२५ मध्ये २६६ कोटी आणि २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ६३.३ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे.