Connect with us

गोवा खबर

आरजी पक्ष बंद करण्याचा निर्णय कधीच झाला नव्हता : खोलकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्ष बंद करण्याचा निर्णय कधीच झाला नव्हता आणि त्यावर कोणतीही चर्चाही झाली नव्हती, असे आरजीचे खजिनदार अजय खोलकर यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, पक्ष बंद होणार ही केवळ एक अफवा असल्याचे सांगत आमदार वीरेश बोरकर यांनी मनोज परब यांना ‘फिल्टर’ लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

आमदार वीरेश बोरकर यांनी मडगाव येथे बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला केंद्रीय कार्यकारी समितीचे पदाधिकारी किंवा इतर महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित केले नव्हते, ज्यामुळे मनोज परब दुखावले गेले. पक्षात २०२३ पासूनच अंतर्गत मतभेद सुरू होते आणि त्याचाच परिणाम म्हणून मनोज परब यांनी अध्यक्षपद व सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आरजी पक्षाची नोंद पीपल्स रिप्रेझेंटेशन कायद्यांतर्गत झाली असल्याने, पक्षाची सर्वसाधारण बैठक न बोलवता पक्ष बंद करण्याचा निर्णय घेता येत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही दुसऱ्या एका प्रकरणात असेच नमूद केले आहे. त्यामुळे केवळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावरच बैठकीत चर्चा झाली होती.

खोलकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, वीरेश बोरकर यांचा विजय केवळ सांत-आंद्रे मतदारसंघापुरता मर्यादित नव्हता, तर राज्यभरात पक्षाने केलेल्या कामाचा तो परिणाम होता. परंतु पक्ष केवळ एकाच गटावर आधारित असल्याचे चित्र तयार केले गेले, जे आम्हाला मान्य नव्हते. नगरनियोजन कायद्याच्या कलम ३९ ए विरोधातील आंदोलन हे केवळ वीरेश बोरकर व तुषार गावस यांचे नव्हते, तर ते संपूर्ण राज्याचे आंदोलन होते. मनोज परब यांनी हे आंदोलन मागे घेण्यासाठी ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला असून, यावर वीरेश व तुषार यांनी जाहीरपणे बोलावे, असे आवाहन खोलकर यांनी केले आहे.