गोवा खबर: दक्षिण गोव्यातील सावर्डे मतदारसंघात संकेत आर्सेकर हे नाव सध्या वेगाने पुढे येताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय आणि संघटनात्मक कामाची पायाभरणी झालेल्या आर्सेकर यांनी पुढे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात संयुक्त सचिवपदावर कार्यरत असतानाच त्यांनी सावर्डे मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले. स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेत त्यावर थेट काम करण्याची त्यांची पद्धत असल्याचे सांगितले जाते.
युवक संघटनावर भर
संकेत आर्सेकर यांनी बजरंग दलाची संघटना उभी करून सावर्डे परिसरातील युवकांना एकत्र आणले. या माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये शिस्त, सामाजिक जाणीव आणि संघटनबळ वाढवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, युवकांना व्यसनापासून दूर ठेवत त्यांना धर्म आणि राष्ट्रकार्याकडे वळवण्याचे काम त्यांनी केल्याचे स्थानिकांकडून कौतुकाने सांगितले जाते.
रोजगार निर्मितीत पुढाकार
स्थानिक पातळीवर सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे रोजगार. आमदारांकडून मिळालेल्या सरकारी नोकऱ्यांपेक्षा तिप्पट नोकऱ्या संकेत आर्सेकर यांनी उपलब्ध करून दिल्याची चर्चा सावर्डे परिसरात आहे. अनेक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते.
पायाभूत सुविधांमध्ये हस्तक्षेप
अनेक वर्षे रखडलेले रस्ते आणि इतर पायाभूत कामे त्यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केल्याचेही स्थानिक पातळीवर बोलले जाते. काही कामे स्वखर्चातून मार्गी लावल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास वाढताना दिसत आहे.
प्रशासनाशी समन्वय आणि प्रभाव
संकेत आर्सेकर यांचा प्रशासनावर चांगला समन्वय असल्याचे मानले जाते. त्यांच्या सूचनेनुसार कंत्राटदार कामे पूर्ण करतात, अशी युवकांमध्ये चर्चा आहे. तसेच पोलिस खात्यातही त्यांची विशेष ओळख असल्याने नागरिकांची कामे जलद गतीने होतात, असे स्थानिकांकडून सांगितले जाते.
राजकीय समीकरणात वाढती ताकद
संघटनबळ, युवकांचा पाठिंबा, विकासकामांवरील लक्ष आणि प्रशासनाशी असलेला समन्वय यामुळे सावर्डे मतदारसंघात संकेत आर्सेकर यांची राजकीय ताकद वाढताना दिसत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते एक प्रभावी आणि उदयोन्मुख नेतृत्व म्हणून समोर येत असून, आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.