गोवा खबर : गोव्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘हेल्थ विथ आयुर्वेद चेकअप बाय डॉक्टर २.०’ या विशेष उपक्रमाचा प्रारंभ केला. साखळी येथे आयोजित एका भव्य आरोग्य शिबिरात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि प्रभावी वैद्यकीय परंपरा असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये अशी शिबिरे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी मोफत आयुर्वेद टेलिकन्सल्टेशनसाठीच्या पोर्टलचेही अनावरण करण्यात आले. “वाढत्या जीवनशैलीच्या आजारांवर मात करण्यासाठी आयुर्वेदाचा अंगीकार करणे आवश्यक आहे,” असे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला.