Connect with us

गोवा खबर

नीती आमोणकर हीच्या कुंचल्यातून साकारले केदारनाथचे विलोभनीय रूप

Published

on

Spread the love

गोवा खबर : कला अकादमीच्या वतीने आयोजित ‘चैत्र पालवी २०२६’ या वार्षिक कला प्रदर्शनात यंदा युवा कलाकार नीती आमोणकर हिने साकारलेले केदारनाथ मंदिराचे चित्र रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. गेली नऊ वर्षे या प्रदर्शनात सातत्याने सहभागी होणाऱ्या नीतीने यंदा आपल्या शैलीत बदल करत निसर्गचित्रांच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक विषयाला हात घातला आहे.

नीतीने केदारनाथ मंदिराचे हे भव्य चित्र अत्यंत बारकाव्यांसह साकारले आहे. या चित्राचे विशेष आकर्षण म्हणजे मंदिराच्या पार्श्वभूमीवर डोंगरांच्या रूपात उमटलेली भगवान महादेवांची प्रतिमा. नीती सांगते की, “माझी खूप आधीपासून केदारनाथला जाण्याची इच्छा होती, जी अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मी चित्राच्या माध्यमातून तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने ज्या दिवशी मी हे चित्र पूर्ण केले, त्याच दिवशी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले गेले, हा माझ्यासाठी एक दैवी संकेतच होता.”

प्रदर्शनाला भेट देणाऱ्या रसिकांनीही या चित्राचे भरभरून कौतुक केले आहे. अनेक रसिकांना या चित्रात महादेवांचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त केली. नीती आमोणकर हिच्या या यशात तिचे गुरु प्रवीण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या कलेमुळे ‘चैत्र पालवी’ प्रदर्शनात एक वेगळीच रंगत आली आहे.