शिष्टमंडळ फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांना निवेदन देताना.
Spread the love
गोवा खबर : फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेले चिकन शॉप तातडीने हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी कौशिक आमोणकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. २० एप्रिल रोजी हे निवेदन देण्यात आले.
फोंडा येथील नागरिकांचे शिष्टमंडळ उपजिल्हाधिकारी कौशिक आमोणकर यांना निवेदन देताना.
या शिष्टमंडळामध्ये इस्कॉनचे ब्रह्मचारी अर्जुन प्रियप्रभू, सत्यविजय नाईक, देवानंद सुर्लेकर, गौतम प्रभू, राजेंद्र देसाई, शिवदत्त नाडकर्णी व इतर नागरिकांचा समावेश होता.
प्रशासनाचे आश्वासन
निवेदन स्वीकारल्यानंतर उपजिल्हाधिकारी कौशिक आमोणकर यांनी फोंडा नगरपालिकेला याप्रकरणी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच, फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांनीही या विषयावर योग्य पावले उचलली जातील, असे नमूद केले आहे.
निवेदनांमधील मुख्य मुद्दे:
दुर्गंधीचा त्रास: भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वारावरील चिकन शॉपमुळे येणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
नियमांचे उल्लंघन: भारतीय न्याय संहितेच्या कलम २९२ आणि ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ (FSSAI) च्या नियमांनुसार, स्वच्छता राखण्यासाठी भाजी विक्री आणि मांस विक्रीचे विभाग स्वतंत्र असणे अनिवार्य आहे.
आरोग्य आणि स्वच्छता: पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे बंधनकारक आहे. चिकन शॉपमुळे निर्माण होणारा कचरा आणि दुर्गंधी सार्वजनिक आरोग्याला घातक ठरू शकते.
स्वतंत्र विभागाची मागणी: फोंडा नगरपालिकेने आधीच मासळी आणि भाजी विक्रीसाठी स्वतंत्र विभाग केले आहेत, त्यामुळे प्रवेशद्वारावरील हे दुकान चिकन मार्केटमध्ये स्थलांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती फोंडा पोलीस ठाणे, अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय, आरोग्य खाते आणि नगराध्यक्षांनाही पाठवण्यात आल्या आहेत.