पणजी: गोव्याच्या परंपरेचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग असलेल्या काजूचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘काजू महोत्सव २०२६’ (Cashew Fest) सज्ज झाला आहे. गोवा वन विकास महामंडळातर्फे (GFDC) आयोजित हा भव्य महोत्सव १० ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत पणजी येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवात सर्व नागरिकांसाठी मोफत प्रवेश असणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तांत्रिक सत्रांपासून ते बॉलिवूडमधील दिग्गज गायकांच्या संगीत मैफलींपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
महोत्सवाचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे:
दिवस १: १० एप्रिल २०२६ (शुक्रवार)
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी १० ते १२:३० या वेळेत काजू लागवड आणि प्रक्रिया यावर तांत्रिक सत्रे होतील. संध्याकाळी लुलु फोर्टेस यांच्या कार्यक्रमाने सांस्कृतिक संध्याकाळची सुरुवात होईल. ५:३० वाजता भव्य उद्घाटन सोहळा पार पडेल. त्यानंतर गोव्यातील प्रसिद्ध ‘उझो’ बँडचे सादरीकरण होईल आणि रात्री ८:३० वाजता प्रसिद्ध गायिका जोनिता गांधी आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील.
दिवस २: ११ एप्रिल २०२६ (शनिवार)
दुसऱ्या दिवशी सकाळच्या तांत्रिक सत्रांनंतर संध्याकाळी डीजे ब्लिंक आणि डेस्टिनी म्युझिक अकॅडमीचे सादरीकरण होईल. फॅशनप्रेमींसाठी फिलू मार्टिन्स यांचा फॅशन शो आकर्षण ठरेल. रात्री ९ वाजता बॉलिवूडचा गाजलेला गायक बेनी दयाल आपल्या लाईव्ह परफॉर्मन्सने स्टेज गाजवणार आहे.
दिवस ३: १२ एप्रिल २०२६ (रविवार)
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गोव्यातील स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे. यात डीजे स्विझल, टोन डेफ्ट, बँड ॲम्बेसेडर्स आणि ‘मेझमरायझर्स’ यांचा डान्स परफॉर्मन्स होईल. गोव्याचा सुप्रसिद्ध ‘A26’ बँड ७:३० वाजता सादरीकरण करेल. महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांच्या धमाकेदार गाण्यांनी होणार आहे.
स्थळ: पणजी, गोवा.
तारीख: १० ते १२ एप्रिल २०२६.
प्रवेश: सर्वांसाठी मोफत.
अधिक माहितीसाठी:gfdcgoa.comया संकेतस्थळाला भेट द्या.
काजूच्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स, अस्सल गोमंतकीय खाद्यपदार्थ आणि संगीताची मेजवानी यामुळे हा महोत्सव पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.