Connect with us

गोवा खबर

सीएसआयआर–एनआयओतर्फे गोव्यात सागरी विषाबाबत जागरूकता व जनजागृती उपक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर : सीएसआयआर–राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (सीएसआयआर-एनआयओ), गोवातर्फे मार्च 27, 2026 रोजी सागरी विषाबाबत जागरूकता आणि जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम  सीएसआयआर  द्वारे निधी प्राप्त विशेष प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आला होता. गोवा किनारपट्टीवरील विषारी सागरी अकशेरुकी जीवांची जैवविविधता आणि रासायनिक विविधता अभ्यासणे हा याचा उद्देश आहे.

गोव्याचे विषारी सागरी जीवन: जैवविविधता, सुरक्षितता आणि वैज्ञानिक संधी” या विषयावरील या उपक्रमाचे उद्घाटन  सीएसआयआर-एनआयओ चे संचालक प्रा. सुनील कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. गोवा पर्यटन विभागाचे उपसंचालक धीरज वागळे यांनी विशेष मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र व विषविज्ञान विभागाच्या प्राध्यापक डॉ. मधु घोडकीरेकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

कार्यक्रमात`गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा सुरक्षित आनंद: सागरी जीवनावरील मार्गदर्शक` या जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेचा उद्देश पर्यटक, जीव रक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांना गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सामान्य विषारी सागरी जीव आणि सुरक्षिततेच्या उपायांविषयी माहिती देणे हा आहे.

या कार्यक्रमात तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. डॉ. कल्याण दे, वैज्ञानिक,  सीएसआयआर-एनआयओ  यांनी गोवा किनारपट्टीवरील विषारी सागरी जीवांविषयी माहिती दिली. सीएसआयआर-एनआयओचे मुख्य वैज्ञानिक डॉ. नरसिंह ठाकूर यांनी सागरी विषांच्या औषधी क्षमतेवर प्रकाश टाकला. तसेच डॉ. मधु घोडकीरेकर यांनी सागरी विषबाधेवरील आपत्कालीन उपचारांवर मार्गदर्शन केले.

‘सागरी विष: सुरक्षितता, पर्यटन जनजागृती आणि संशोधन’ या विषयावर गट चर्चाही यावेळी झाली. डॉ. मधु घोडकीरेकर, डॉ. चंद्रकांत पोरोब, दृष्टी मरीनचे आकाश फुलकर, डॉ. मंदार नानजकर, डॉ. कल्याण डे आणि डॉ. नरसिंह ठाकूर यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विषारी सागरी जीवांवरील भित्तीपत्रक, माहितीफलक आणि जनजागृती साहित्याचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमातून गोवा किनारपट्टीवरील विषारी सागरी जीवांविषयी जागरूकता वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच सागरी विषबाधेच्या घटनांवर प्रभावी प्रतिसाद यंत्रणा विकसित करणे आणि सागरी जैवविविधतेचे संवर्धन यावर भर देण्यात आला. याशिवाय सागरी विषांमध्ये वैद्यकीय आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या जैवसक्रिय संयुगांचे मोठे वैज्ञानिक महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमात वैज्ञानिक, वैद्यकीय तज्ज्ञ, जीव रक्षक, पर्यटन विभागाचे अधिकारी, विद्यार्थी आणि किनारी भागातील संबंधित घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे समन्वयन मुख्य वैज्ञानिक व प्रकल्प प्रमुख डॉ. नरसिंह एल. ठाकूर तसेच वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक व  सीएसआयआर-एनआयओच्या सह-प्रधान संशोधक डॉ. सुप्रिया टिळवी यांनी केले.