Connect with us

गोवा खबर

श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक आठवले यांचा गौरव

Published

on

Spread the love

स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान; पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात २६ संतांचा बहुमान

गोवा खबर : दत्त परंपरेतील महान संत आणि शक्तिपात योगाचे अध्वर्यू गुळवणी महाराज यांच्या दीक्षा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या अद्वितीय धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन हा बहुमान प्रदान करण्यात आला.

पुण्यातील एरंडवणे येथील ‘श्रीवामन निवास’ येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव (२०२०-२०२६)’ हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वतीने सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी हा सन्मान स्वीकारला. शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

महोत्सवाचे ऐतिहासिक महत्त्व हा सोहळा अनेक महत्त्वपूर्ण घटनांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये श्रीवासुदेव निवास स्थापनेचा हीरक महोत्सव, श्रीदत्त महाराज कवीश्वर पुण्यतिथी रौप्य महोत्सव, योगतपस्वी श्रीनारायणकाका ढेकणे महाराज जयंती शताब्दी महोत्सव आणि विद्यमान उत्तराधिकारी शरदभाऊ जोशी यांचा ‘योगभक्ती अमृत महोत्सव’ यांचा समावेश होता.

२६ संतांचा सन्मान समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे कार्य करणाऱ्या सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळावेत, या उदात्त हेतूने वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व लोकनाथतीर्थ स्वामी महाराज ट्रस्ट’च्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतभरातील २६ संतांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित संतांनी यावेळी साधनेचे महत्त्व अधोरेखित केले.

भक्तिमय समारोप कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण, पादुकापूजन आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने झाला. सोहळ्याचा समारोप टेंबे स्वामी विरचित ‘दत्त त्रिपदी’च्या व्हायोलिन वादनाने झाला. शिरीषकुमार आणि अरुणकुमार उपाध्ये यांनी सादर केलेल्या या वादनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.