गोवा खबर : एका हाय-प्रोफाईल व्यक्तीशी संबंध आणि मनी लाँडरिंगच्या खोट्या प्रकरणात अडकवून पणजीतील एका रहिवाशाची ९० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गोवा सायबर क्राईम पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी केरळमधील मलप्पुरम येथून २१ वर्षीय मोहंमद रशीक पुलिक्कल या संशयिताला अटक केली आहे
नेमकी घटना काय?
तक्रारदाराला वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन करून संशयितांनी आपण ‘ट्राय’ (TRAI) आणि सीबीआयचे (CBI) अधिकारी असल्याचे भासवले. “तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर झाला असून तुमचा एका प्रसिद्ध व्यक्तीसोबत मनी लाँडरिंग प्रकरणात सहभाग आहे,” असा बनाव त्यांनी रचला. त्यानंतर तक्रारदाराला तथाकथित ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) खाली ठेवून, हे प्रकरण मिटवण्यासाठी ९०,८५,०००/- रुपयांची मागणी केली आणि ती रक्कम ट्रान्सफर करून घेतली.
तपासाचे चक्र आणि अटक
याप्रकरणी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तांत्रिक तपासाअंती संशयित केरळमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पीएसआय नवीन नाईक, कॉन्स्टेबल यश कोळे आणि सिहारमय्या मठ यांच्या पथकाने केरळला जाऊन मोहंमद रशीक याला ताब्यात घेतले.
तपासातील धक्कादायक माहिती:
- पैशांचा व्यवहार: संशयिताच्या बँक खात्यात सुरुवातीला ५ लाख रुपये जमा झाले होते, जे नंतर इतर साथीदारांच्या खात्यात वळवण्यात आले.
- आंतरराज्य धागेदोरे: हेच बँक खाते कर्नाटक आणि गोव्यातील इतर दोन सायबर फसवणूक प्रकरणांशी जोडलेले आहे.
- मोठी लूट: या सर्व प्रकरणांमधील एकूण फसवणुकीचा आकडा २ कोटी १० लाख रुपयांच्या घरात आहे.
- पुढील कार्यवाही
सध्या संशयिताला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सायबर क्राईम पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर हे एएसपी बी.व्ही. श्रीदेवी आणि एसपी राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.