डॉ. पूर्णानंद चारी यांचे प्रतिपादन; वीरनोडा येथे ‘बोली कणकणी कोकणी’ उपक्रमाचा शुभारंभ
गोवा खबर: “गोवा कोकणी अकादमी ‘बोली कणकणी कोकणी’ या उपक्रमाद्वारे नवा इतिहास रचत आहे. गावागावात आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमांतून आम्हाला कोणाशीही भाषावाद करायचा नसून, प्रत्येकाशी संवाद साधून बोलीभाषेचा प्रसार करायचा आहे,” असे प्रतिपादन गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद चारी यांनी केले.
वीरनोडा येथील रवळनाथ देवस्थान सभागृहात आयोजित ‘बोली कणकणी कोकणी’ उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम गोवा कोकणी अकादमी, संत सोयरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय (NSS विभाग), ‘आम्ही पेडणेकर’ संस्था आणि शिवप्रतिष्ठान नाट्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
बोलीभाषेचा शब्दकोश : काणकोण ते पेडणे या संपूर्ण गोव्यात एकाच वस्तूला वेगवेगळ्या बोलीत काय म्हटले जाते, याचा अभ्यास करून एक सर्वसमावेशक शब्दकोश आणि ग्रंथ तयार करण्याचा मानस डॉ. चारी यांनी व्यक्त केला.
संस्कृतीचे जतन : “आज आपण पिझ्झाकडे वळत आहोत, पण त्यापेक्षा आपल्या पारंपरिक दाट भाकरी, शिरनी-कातळी अशा खाद्यसंस्कृतीकडे पुन्हा वळायला हवे. यातूनच बोलीभाषेतील अस्सल शब्द आपल्याला सापडतील,” असे आवाहन त्यांनी केले.
कोकणी हा आमचा आत्मा : संयुक्त संचालक उल्हास नाईक यांनी सांगितले की, भारतात १९,५०० बोलीभाषा आहेत. कोकणी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपली संस्कृती आणि आत्मा आहे. ‘कोकणी उलय, कोकणी बरय आणि कोकणीतले पुढारी घडय’ हे ब्रीद आपण जपले पाहिजे.
अस्सल पेडणेकर गोडवा : वीरनोडा सरपंच स्वाती मालपेकर यांनी पेडणे तालुक्यातील भाषेतील गोडवा आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
उपस्थित मान्यवर:
यावेळी उपप्राचार्य सचिन वेटे, संयुक्त संचालक उल्हास नाईक, साहित्यिक शशिकांत पुनाजी, प्रा. प्रियांका परब, मायरन परेरा, केशव महाले, पांडुरंग परब, उपसरपंच सागर परब व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक मेजवानी:
उद्घाटन सत्रानंतर महिला मंडळांनी फुगडी, धालो आणि लग्नाच्या ओव्या सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. शशिकांत पुनाजी, नागेश गोसावी, रत्नेश शिरोडकर, अद्वैत साळगावकर व संजना शेटगावकर यांनी साहित्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन ऋषी परब यांनी केले.