गोवा खबर : फोंडा विधानसभा पोटनिवडणूक ही गोव्यातील राजकारणात निर्णायक ठरणार आहे. भाजपच्या सत्तेला धक्का देत राज्यात परिवर्तनाची सुरुवात इथूनच होईल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला असून, लोक काँग्रेसकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.
काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर मंगळवारी डॉ. केतन भाटीकर यांचे अभिनंदन करताना ठाकरे बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, सरचिटणीस राजेश वेरेकर, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष नितीन चोपडेकर, महिला अध्यक्ष प्रतीक्षा खलप, गटाध्यक्ष विलियम आगियार, वरिष्ठ नेते जॉन परेरा, विल्मा परेरा, अरुण गुडेकर, सातान फर्नाडिस, नारायण नाईक आदी उपस्थित होते. सुरुवातीला वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी प्रास्ताविक केले.
ठाकरे पुढे म्हणाले की, भाजप सरकारने गोव्यात अनेक समस्या निर्माण केल्या असून जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरकार पुन्हा आणण्यासाठी फोंडा पोटनिवडणुकीपासूनच सुरुवात करावी लागेल. काँग्रेसने जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा उमेदवार दिला असून, इतर पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, मागील निवडणुकीत राजेश वेरेकर आणि केतन भाटीकर स्वतंत्रपणे लढले होते. त्या दोघांच्या मतांची एकत्रित बेरीज पाहता या विरोधकांना एकत्र करण्याचे काम सुरू आहे.
फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यावर भर दिला आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचे संकेत माणिकराव ठाकरे यांनी दिले. विविध पक्षांशी चर्चा करून व्यापक आघाडी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे. भाजपला अजूनही उमेदवार ठरवताना अडचणी येत असल्याने त्यांच्या गोंधळाची प्रचिती येते. सत्तेचा आणि पैशाचा वापर करून भाजप लढत देण्याचा प्रयत्न करेल; मात्र काँग्रेस एकदिलाने काम करून विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, केतन भाटीकर यांनी उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानले. राजेश वेरेकर यांनी मोठ्या मनाने दिलेल्या पाठिंब्याचे ते ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत प्रचाराच्या अनेक फेऱ्या पूर्ण झाल्या असून, या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यावर भर दिला आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचे संकेत माणिकराव ठाकरे यांनी दिले.
मागील निवडणुकीतील मतदानाचा आकडा पाहता राजेश वेरेकर आणि केतन भाटीकर यांच्या मतांची बेरीज काँग्रेससाठी सकारात्मक मानली जात आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून, संघटित एकजूट यावर भर देत पक्ष विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.