गोवा खबर : गोव्यातील इको पर्यटनाच्या विस्तारासाठी संबंधित दावेधारकांच्या सूचनांनुसार, पर्यटन विभागाने एक पथदर्शक आराखडा तयार केल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज राज्य विधानसभेत दिली. वन खात्याच्या सहकार्याने इको पर्यटन धोरण तयार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
प्रश्नोत्तर तासाला विधानसभेत आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी इको पर्यटनाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना खंवटे सभागृहात बोलत होते. इको पर्यटनासाठीचे विभाग निवडण्यात आले आहेत का, तसेच कचरा व्यवस्थापनासाठीचा काय विचार केला आहे, असा उपप्रसश्न लॉरेन्सा यांनी मूळ प्रश्नावरील चर्चेवेळी केला होता.
ग्रामीण भागात जबाबदार पर्यटन करतानाच, पर्यावरणाचा सांभाळ करणे आणि स्थानिक समुदायाला उपजिविकेचे साधन त्या माध्यमातून करून देण्याचा हेतू इको पर्यटनाच्या विस्तारातून केल्याची माहिती पुढे बोलताना खंवटे यांनी दिली.

२०२२ साली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर, सरकारने पर्यटकांना समुद्रा पल्याडचा गोवा अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यात इको, योगा आणि वेलनेस, आध्यात्मिक व आंतरग्राम पर्यटनाची कवाडे पर्यटकांसाठी खुली केल्याची माहिती त्यांनी पुढे दिली.
पर्यटन खात्याने पावसाळ्यात खास मान्सून पर्यटनाचाही उपक्रम सुरू केला असून त्याव्दारे आंतरग्राम पर्यटनाला चालना मिळेल अशी माहिती पर्यटनमंत्र्यांनी दिली. मान्सून पर्यटनांतर्गत ट्रॅक्स अँड ट्रेल्स आयोजित करण्यात येत असून त्याव्दारे पर्यटकांना ग्रामीण गोव्याचे दर्शन पर्यटकांना करून देणे, हा आमचा हेतू असल्याचे पर्यटनमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दूधसागर हा देशातील तिसरा सर्वांत उंच धबधबा असून २ लाख ३६ हजार पर्यटकांनी गेल्या वर्षी त्याला भेट दिली आहे. काणकोणच्या खोतीगावमध्ये गूळ निर्मिती करण्यात येत आहे. तसेच तेथे बांबूकामही केले जात असून पर्यटकांना गोव्याचे हे ग्रामीण कलात्मक दर्शन व्हावे व त्याव्दारे तेथील स्थानिक समुदायाला उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे या हेतूने इको पर्यटनाची संकल्पना राबविल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
बोंडला अभयारण्य, तांबडी सुर्ला परिसर, मैनापी, भोमा, चरवणे व इतर भागातील धबधबे हे गोव्याचे वैभव असून तेथे पर्यटकांची पावले वळली तर गोव्याच्या ग्रामीण भागाचाही यथायोग्य विकास होईल, हा विचारही इको पर्यटन विस्तारामागे असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.
पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेलाच बळकटी मिळत नाही तर स्थानिक समुदायालाही उत्पन्न मिळत असल्याने इको टुरीझमचा विस्तार आणि प्रसार महत्वाचा असल्याचे खंवटे यांनी अधोरेखित केले.
पर्यटन खात्याने इको पर्यटन विस्ताराच आऱाखडा तयार केला असून लवकरच संबंधितांच्या विधायक सूचना लक्षात घेऊन पुढील पावले उचलण्याची ग्वाही खंवटे यांनी दिली.