Connect with us

गोवा खबर

हैदराबादमधील टेक्नॉलॉजी सभेत गोव्याला ‘डिजिटल एक्सलन्स अवॉर्ड

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाला (डीआयटीईएण्डसी) हैदराबाद येथे आयोजित टेक्नॉलॉजी सभेच्या ३९व्या आवृत्तीत डिजिटल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. तंत्रज्ञान क्षेत्र आणि डिजिटल प्रशासन पुढे नेण्यासाठी विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान देण्यात आला.

इंडियन एक्सप्रेस समूहाने आयोजित केलेली टेक्नॉलॉजी सभा ही ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मंच आहे. या कार्यक्रमात नेतृत्वपर चर्चा, अभ्यासपूर्ण केस स्टडीज, उत्तम पद्धती, नेटवर्किंगच्या संधी आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाद्वारे डिजिटल प्रशासनाच्या चर्चेला दिशा दिली जाते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स मंत्री दुद्दिला श्रीधर बाबू यांच्या हस्ते झाले.

२७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान झालेल्या या कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाचे संचालक कबीर शिरगावकर आणि स्टेट ई-गव्हर्नन्स मिशन टीम (SeMT) गोवा यांच्या प्रमुख शारदा कटारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच गोवा राज्याचे गुन्हे आणि सायबर क्राइम विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनीही या कार्यक्रमात राज्याचे प्रतिनिधित्व केले.

कार्यक्रमादरम्यान गोवा प्रतिनिधीमंडळाने विविध पॅनल चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी कबीर शिरगावकर यांनी ‘The Federation of Innovation: Driving Digital Governance Through Policy, Platforms and State Leadership’ या विषयावरील सत्रात पॅनेलिस्ट म्हणून सहभाग घेतला. राहुल गुप्ता यांनी ‘Reimagining Governance & Administration Through Technology: Digital Transformation, AI and Future-Ready IT Infrastructure’ या विषयावरील चर्चेत पॅनेलिस्ट म्हणून सहभाग नोंदवला. सौ. शारदा कटारे यांनी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षा विषयक चर्चासत्रात भाग घेतला.

या सन्मानामुळे डिजिटल नवोन्मेष आणि प्रशासनाच्या क्षेत्रात गोव्याचे वाढते नेतृत्व अधोरेखित झाले आहे. स्पष्ट धोरण, भविष्याभिमुख योजना आणि नव्या तंत्रज्ञानावर असलेल्या भरामुळे डीआयटीईएण्डसी विभाग समावेशक डिजिटल परिवर्तनाला गती देण्यास आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनात गोव्याला आदर्श राज्य म्हणून उभे करण्यासाठी कटिबद्ध आहे.