Connect with us

गोवा खबर

25 व्या भारत रंग महोत्सवाच्या गोवा आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव असलेल्या 25 व्या भारत रंग महोत्सव 2026 च्या गोवा आवृत्तीचे साखळी येथे उद्घाटन केले. हा पाच दिवसीय महोत्सव राष्ट्रीय नाट्य प्रशालेचा (एनएसडी) प्रमुख महोत्सव असून त्याचे आयोजन गोव्याच्या कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

या समारंभात गोवा राज्य सरकारचे कला व संस्कृती, आदिवासी  कल्याण आणि क्रीडा व युवक व्यवहार मंत्री डॉ रमेश तवडकर,गोवा राज्य सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक विवेक नाईक व  उपसंचालक मिलिंद माटे उपस्थित होते.एनएसडी संस्थेचे उपाध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रा भरत गुप्त या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे नाट्यरसिक, रंगकर्मी , कलाप्रेमी व सार्वजनिक सेवा क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात व उत्साहाने सहभागी झाले होते.या भव्य महोत्सवाच्या आयोजनात मोलाचे योगदान देणाऱ्या साखळी नगर परिषदेच्या अध्यक्ष सिद्धी पोरोब व साखळीच्या रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्तात्रय चिमुलकर हे देखील यावेळी उपस्थित होते .

साखळी इथे आयोजित यावर्षीच्या महोत्सवात उत्तम आशय व प्रभावी कथानक  असलेली, प्रशंसा प्राप्त झालेली  नाटके सादर करण्यात येत आहेत. हा महोत्सव 2 फेब्रुवारी 2026  ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होत असून यामध्ये भारताच्या विकासशील नाट्यक्षेत्रातील अनेकविध पैलूंची प्रस्तुती केली जात आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संकेत पारखे व ऋत्विक व्यास लिखित मराठी नाटक ‘अलाईव्ह’ सादर झाले. एनसीपीए ची प्रस्तुती असलेले हे नाटक संकेत पारखे यांनी दिग्दर्शित केले होते.

फ्लोरियन झेलरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशंसनीय कार्याचे संवेदनशील रूपांतर दर्शविणारे फ्लोरियन झेलर लिखित आणि दक्ष प्रदीप शिरोधर दिग्दर्शित ‘फादर’ हे मराठी नाटक गोव्यातील  मंगेशी येथील मांगीरिश युथ क्लबद्वारे दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सादर झाले.

4 फेब्रुवारी  रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अवनीश मिश्रा लिखित आणि दिग्दर्शित, मुंबईतील रंगशीला थिएटर ग्रुपने सादर केलेल्या ‘द मॉर्निंग शो’ हे हिंदी नाटक होईल.या नाटकातून  विनोद, उपहास आणि सामाजिक भाष्य यांचा समावेश असलेली एक आकर्षक कथा सादर केली आहे.

5 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता, प्रेक्षकांना ‘ब्लडी बॉम्बे’ हा एक सशक्त हिंदी चित्रपट पहायला मिळेल. हॅपी रणजित लिखित,दिग्दर्शित आणि युनिकॉर्न अ‍ॅक्टर्स स्टुडिओ, मुंबई द्वारे सादर केला जाणारा हा चित्रपट शहरी जीवनातील अनवट आणि बहुस्तरित वास्तव  उलगडतो.

6 फेब्रुवारीला दृपथी या धारिणी कोमल यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या तमिळ नाटकाने समारोप होईल.

एनएसडी द्वारे आयोजित 25 वा भारत रंग महोत्सव हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आहे. या महोत्सवाचे हे 25 वे वर्ष असून, BRM 2026, 27 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत एकूण 25 दिवस चालू राहील.यामधे 228 हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमधील 277  निर्मिती सादर  केल्या जातील, ज्यामध्ये अनेक कमी प्रतिनिधित्व असलेल्या भाषांचाही समावेश आहे. या महोत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक निर्मिती एकत्र आणल्या जातात, ज्यामध्ये 9 देश; तसेच भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नाट्यसमूह सहभागी होतील.

भारताच्या नाट्य विविधतेचा उत्सव साजरा करणाऱ्या, BRM 2026 मध्ये बालकांचे समूह, आदिवासी समुदाय आणि उपेक्षित घटकातील कलाकारांचे सादरीकरण समाविष्ट आहे, जे एनएसडी च्या सर्वसमावेशकता आणि नाट्य सादरीकरणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी वचनबद्धतेला अधोरेखित करते .

एनएसडी रंगभूमीच्या प्रसार आणि लोकशाहीकरणासाठी सतत काम करत आहे. अलिकडेच, त्यांनी रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी रंग आकाश हा इंटरनेट रेडिओ सुरू केला आहे आणि त्याचबरोबर देशभरातील नाट्यप्रेमींना त्यांच्या काही मौल्यवान निर्मिती पोहोचवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म नाट्यम देखील सुरू केला आहे.