Connect with us

गोवा खबर

पणजीत गोवा पुस्तक महोत्सवात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी उपक्रम

Published

on

Spread the love
  • शिक्षण खात्यातर्फे शाळांना परिपत्रक जारी
    विद्यार्थ्यांना पुस्तक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

 

गोवा खबर : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या बौद्धिक व सर्जनशील विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या ४ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कांपाल पणजी येथील बांदोडकर मैदानावर पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर गोवा सरकारच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित तसेच विनाअनुदानित खासगी शाळांना परिपत्रकाद्वारे महत्त्वाची सूचना दिली आहे. शिक्षण संचालक शैलेश सिनाय झिंगडे यांनी जारी केलेल्या या परिपत्रकामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना वाचनविश्वाशी थेट जोडले जाण्याची संधी मिळणार असून, गोव्यातील शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.या परिपत्रकानुसार, शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांसह पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुस्तक महोत्सवात विविध प्रकारचे साहित्य, शैक्षणिक साधने, संवादात्मक सत्रे, कथा सांगण्याचे उपक्रम तसेच कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः बालविभागात आयोजित उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, अनुभवाधारित व ताणमुक्त शिक्षण देणारे ठरणार आहेत. हे सर्व उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच शालेय पातळीवरील दप्तरविरहित दिवस या संकल्पनेशी सुसंगत असल्याचे शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे येण्या – जाण्याचे नियोजन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे मार्गदर्शन व आवश्यक समन्वय साधण्याची जबाबदारी शाळांनी घ्यावी, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रक शाळांना उपलब्ध करून देण्यात आले असून, अधिक माहितीसाठी विलास सतरकर (८८०६६९४६६६) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.