Connect with us

गोवा खबर

गोव्यात प्रथमच राष्ट्रीय बुक फेस्टिवलचा उत्सव; युवा छायाचित्रकारांसाठी फोटो प्रदर्शन व स्पर्धा

Published

on

Spread the love

गोवा खबर : नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या सहकार्याने गोव्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील अति भव्य बुक फेस्टिवल आयोजित करण्यात येत असून, हा साहित्यिक आणि सांस्कृतिक उत्सव ४ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बांदोडकर स्टेडियम, कॅम्पाल, पणजी येथे रंगणार आहे. या ऐतिहासिक बुक फेस्टिवलच्या निमित्ताने गोव्यातील तरुण आणि उत्साही छायाचित्रकारांसाठी खास छायाचित्र प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘गोवा – उत्सव आणि संस्कृती’ हा या स्पर्धेचा मध्यवर्ती विषय आहे. गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोकजीवन, सण-उत्सव आणि वारसा यांचे प्रभावी दर्शन घडवणारी सुमारे २०० छायाचित्रे या प्रदर्शनासाठी निवडली जाणार आहेत. ही स्पर्धा १५ ते २५ वयोगटातील नॉन-प्रोफेशनल छायाचित्रकारांसाठी खुली असून, सहभागी छायाचित्रे A3 आकारातील रंगीत असावीत. छायाचित्रे मॅट किंवा ग्लॉस पेपरवर, फ्रेमशिवाय सादर करावीत तसेच प्रत्येक छायाचित्राला १ सेंटीमीटरचा पांढरा बॉर्डर असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे २ फेब्रुवारी पूर्वी गोमंतक सेवक मंडळ, पणजी, गोवा येथे जमा करावीत, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

छायाचित्र सादर करताना प्रत्येक विद्यार्थ्याने छायाचित्राचे शीर्षक व त्याबाबत ३ ते ५ ओळींचे वर्णन, स्वतःचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, वय, ओळखपत्राची प्रत, विक्री किंमत (यातील १० टक्के रक्कम समितीकडे वर्ग केली जाणार), पेमेंटचा तपशील (लोकमान्य यांना GPay द्वारे), छायाचित्र मूळ व अस्सल असल्याचे प्रमाणपत्र तसेच A3 आकाराचा लिफाफा जोडणे बंधनकारक आहे.

दरम्यान, या उपक्रमामुळे गोव्यातील युवा छायाचित्रकारांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या कलागुणांना नवी दिशा आणि ओळख मिळेल. साहित्य, कला आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या राष्ट्रीय बुक फेस्टिवल व छायाचित्र प्रदर्शनास गोमंतकीय नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, इन्स्टिट्युट मिनेझिस बिल्डिंग पणजी अधिक माहितीसाठी नीना नाईक ( ९८२३०५१४३३) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी १०,००० रुपये (१ बक्षीस), द्वितीय क्रमांकासाठी ७,५०० रुपयांची (२ बक्षिसे), तृतीय क्रमांकासाठी ५,००० रुपयांची (३ बक्षिसे), तसेच ३,००० रुपयांची ५ उत्तेजनार्थ बक्षिसे आणि २,५०० रुपयांची ५ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय विशेष मुलांसाठी २,५०० रुपयांची ५ खास बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.